वृत्तसंस्था/ लॉसेन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने प्रो हॉकी लीगचे दोन सामने लांबलणीवर टाकले असल्याचे गुरुवारी जाहीर पेले. ज्या देशात हे सामने होणार होते, तेथे कोव्हिड 19 महामारीमुळे प्रवासावर निर्बंध असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रिटन व जर्मनी पुरुष संघांचा सामना पुढील आठवडय़ाच्या अखेरीस तर चीन व बेल्जियम महिलांचा सामना पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार होता. ‘जर्मनी, बेल्जियम, चीन या देशात कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवास करणाऱया संघांच्या विनंतीवरून एफआयएचने प्रो हॉकी लीगचे हे सामने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे एफआयएचने सांगितले. या वैश्विक महामारीच्या स्थितीवर फेडरेशनने बारीक लक्ष ठेवले असून संबंधितांशी विचावविनिमय केल्यानंतर या सामन्यांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येतील. असे निर्णय घ्यावे लागतात याचे वाईट वाटते, पण परिस्थितीचे गांभीर्यही लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे याक्षणी योग्य असणारा निर्णयच आम्ही घेतला आहे,’ असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
एफआयएच हॉकी प्रो लीगचा हा दुसरा मोसम असून प्रतिवर्षी होणाऱया या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम महिला व पुरुष हॉकी संघ सहभागी होतात. यावर्षी जानेवारीत त्याची सुरुवात झाली होती. पण कोरोनामुळे अनेक सामने लांबणीवर टाकावे लागल्याने पुढील वर्षीच्या मे पर्यंत त्याची मुदत वाढविण्यात आली आहे.









