वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
एफआयएच प्रो लीग हॉकीमध्ये आठ सामन्यांनंतर चांगल्या स्थितीत असलेल्या भारताच्या पुरुष संघाची शनिवारी इंग्लंडविरुद्ध लढत होत असून या लढती जिंकून गुणतक्त्यात पहिले स्थान मिळविण्याचे भारताचे ध्येय असेल. यातील दुसरा सामना रविवारी खेळविला जाणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविलेल्या भारताने आतापर्यंतच्या आठ सामन्यांत 16 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. जर्मनी 17 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारताने या लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 10-2, 10-2 असा पराभव केला. त्यानंतर फ्रान्सविरुद्ध एक सामना जिंकला व एक गमविल्यानंत स्पेनविरुद्धही एक जिंकला व एक सामना गमविला. अलीकडेच अर्जेन्टिनाविरुद्ध झालेल्या लढतीत भारताला पहिल्या सामन्यात 2-2 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱया सामन्यात भारताने अर्जेन्टिनावर 4-3 असा रोमांचक विजय मिळविला.
इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरताना भारताला बचावातील त्रुटी दूर करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण प्रत्येक सामन्यात भारताची बॅकलाईन दडपणाखाली कोसळल्याचे दिसून आले आहे. सॉफ्ट गोल देण्याची भारताला सवय लागली असून हरमनप्रीतनेही ते मान्य केले आहे. डिपेंडर्सनी निर्णयक्षमतेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे तो म्हणतो. भारताच्या आघाडी फळीने मात्र उत्तम कामगिरी बजावली असून आठ सामन्यांत त्यांनी 42 गोल नोंदवले आहेत. विशेषतः मनदीप सिंगने प्रतिस्पर्ध्यांच्या सर्कलमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अर्जेन्टिनाविरुद्ध त्याने शेवटच्या मिनिटाला विजयी गोल नोंदवला होता.
भारत व इंग्लंड यांच्यात यापूर्वी झालेल्या शेवटच्या लढतीत भारताने 3-1 असा विजय मिळविला होता. टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत ही लढत झाली होती. जागतिक हॉकी क्रमवारीतही भारत इंग्लंडपेक्षा पुढे असून भारत चौथ्या तर इंग्लंड सातव्या स्थानावर आहे. प्रो लीगमध्येही 6 गुणांसह इंग्लंड सातव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत दोन सामने जिंकले व दोन गमविले आहेत.









