वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2021-22 च्या प्रो हॉकी लिग स्पर्धेतील भारतात होणारे सामने प्रेक्षकांविना खेळविले जातील, अशी घोषणा स्पर्धा आयोजकांनी केली आहे. हे सामने भुवनेश्वरच्या कलिंगा हॉकी स्टेडियमवर 26 फेब्रुवारीपासून खेळविले जातील.
कोरोना संदर्भातील सावधगिरी बाळगताना हॉकी इंडिया आणि आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने हे आगामी सामने प्रेक्षकांविना खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यांचे क्रीडा वाहिनीवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांचे हे सामने स्पेन आणि जर्मनीबरोबर खेळविले जाणार आहेत. भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांचे स्पेनविरुद्धचे सामने 26 व 27 फेबुवारीला तर त्यानंतर जर्मनीविरुद्धचे सामने 12 आणि 13 मार्चला होणार आहेत. भारतीय पुरुष संघाचे अर्जेंटिनाबरोबरचे सामने 19 आणि 20 मार्चला खेळविले जातील. या सामन्यानंतर भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ 2 आणि 3 एप्रिल रोजी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये सामने खेळणार आहेत.