क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील स्पोर्टिंग क्लुब दी गोवा आणि कळंगूट असोसिएशन यांच्यातील लढत 2-2 अशी बरोबरीत संपली. त्यानंतर प्रकाशझोतात खेळविण्यात आलेला एफसी गोवा आणि गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामनाही 1-1 असा बरोबरीत संपला.
स्पोर्टिंग क्लुब दी गोवा- कळंगूट असोसिएशन बरोबरीत
काल खेळविण्यात आलेली स्पोर्टिंग क्लुब दी गोवा आणि कळंगूट असोसिएशन यांच्यातील लढत 2-2 अशी बरोबरीत राहिली. या निकालने उभय संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. कळंगूट असोसिएशनसाठी दोन्ही गोल सिद्धार्थ कुंडईकरने केले तर स्पोर्टिंग क्लुब दी गोवासाठी फिलीप ओदोग्वू आणि मार्पुसने नोंदविले.
स्पोर्टिंग क्लुब दी गोवाने पहिल्या सत्रात गोल नोंदवून आघाडी घेतली. क्लाईव्ह मिरांडाने केलेल्या थ्रो-इनवर फिलीप ओदोग्वूने प्रतिस्पर्धी बचावपटू मॅल्विन लोबोला गुंगारा देत गोलरक्षक परमवीर सिंगला भेदले आणि चेंडू जाळीत टाकला.
दुसऱया सत्रात कळंगूट असोसिएशनने चांगलाखेळ केला आणि बरोबरीचा गोल केला. 53व्या मिनिटाला डॅरील कॉस्ता आणि ऍल्टन वाझ यांनी रचलेल्या चालीवर सिद्धार्थ कुंडईकरने स्पोर्टिंगच्या गोलरक्षकाला भेदले व बरोबरीचा गोल केला. त्यानंतर 67व्या मिनिटाला आशुम्पशन सुवारीसच्या पासवर मार्पुसने गोल नोंदवून स्पार्टिंग क्लुबला परत एकदा आघाडीवर नेले. त्यानंतर शेवटच्या क्षणी कळंगूट असोसिएशनच्या सिद्धार्थ कुंडईकरने फ्रिकीकवर गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला.
एफसी गोवा- गार्डीयन एँजल लढत बरोबरीत
प्रकाशझोतात जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आलेला एफसी गोवा आणि गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत संपला. हे दोन्ही गोल दुसऱया सत्रात झाले. 69व्या मिनिटाला जॉयबर्ट आल्मेदाने गोल करून एफसी गोवाला आघाडीवर नेले होते. त्यानंतर सामना संपण्यास तीन मिनिटे शिल्लक असताना गार्डीयन एँजल क्लबच्या निकोलस फर्नांडिसने बरोबरीचा गोल केला.









