प्रतिस्पर्धी बेंगळूर बुल्सवर 46-30 अशा एकतर्फी फरकाने मात, 19 गुणांसह अभिषेक सिंगचा लक्षवेधी खेळ, बेंगळूर बुल्सतर्फे पवन, चंद्रनची झुंज निष्फळ
बेंगळूर / वृत्तसंस्था
रायडर अभिषेक सिंगच्या धडाकेबाज खेळाच्या बळावर यू मुम्बा संघाने प्रो कबड्डी लीगमधील सलामी लढतीत प्रतिस्पर्धी बेंगळूर बुल्सला 46-30 अशा फरकाने नमवले आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली. यू मुम्बाच्या विजयात अभिषेक सिंगचा बहारदार खेळ लक्षवेधी ठरला. अभिषेकने 19 गुण संपादन करत या विजयात मोलाचा वाटा उचलला. अभिषेकशिवाय, यू मुम्बातर्फे अजितने 6 गुणांचे योगदान दिले.
बेंगळूर बुल्स संघ बिकट स्थितीत असताना पवन सेहरावतकडून मुख्य अपेक्षा होत्या. पण, तो 12 गुण संपादन केल्यानंतरही मुख्य अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. सातव्या प्रयत्नातही पवनला यश मिळाले नाही आणि यू मुम्बाची आघाडी कायम राहत गेली. बेंगळूरतर्फे पवन सेहरावतने 12 तर चंद्रन रंजितने 13 गुणांची कमाई केली. पण, अन्य सहकाऱयांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही आणि हा संघ मोठय़ा फरकाने पराभूत झाला.
यू मुम्बाने पहिल्या सत्रात 24-17 अशी सात गुणांची आघाडी मिळवली आणि दुसऱया सत्राअखेर 46-30 अशा फरकाने ती वाढवली. या सामन्यात बेंगळूरची सुरुवात बरीच खराब राहिली. पवन सेहरावत आपल्या पहिल्याच रेडमध्ये बाद झाला. बुल्सने त्यानंतर थोडाफार प्रतिकार जरुर केला. पण, यू मुंबाने त्यांना 8 व्या मिनिटालाच ऑलआऊट करत वर्चस्व प्रस्थापित केले.
ऑलआऊट व्हावे लागल्यानंतर चंद्रन रंजितने 2 सुपर रेड लगावत संघाला ट्रकवर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसरीकडे, पवन सेहरावतने देखील काही महत्त्वाचे गुण प्राप्त केले. याच बळावर बेंगळूरचा संघ यू मुम्बाला ऑलआऊट करण्याच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचला होता. पण, याचवेळी अभिषेक सिंगने सुपर रेड करत एकीकडे, आपल्या संघावरील ऑलआऊटची नामुष्की टाळली, शिवाय, दुसरीकडे, आपले सुपर-10 ही दणक्यात साजरे केले. पहिले सत्र संपता संपता बुल्सचा संघ पुन्हा एकदा ऑलआऊट होण्याच्या मार्गावर फेकला गेला.
दुसऱया सत्रात यू मुम्बाने जबरदस्त सुरुवात केली आणि लवकरच बेंगळूर बुल्सला सामन्यात दुसऱयांदा ऑलआऊट केले. बुल्सतर्फे रंजित व कर्णधार सेहरावत यांनी प्रत्येकी 10 पेक्षा अधिक गुण घेत संघाचे आव्हान कायम ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, यानंतरही यू मुम्बाची सामन्यातील आघाडी अभेद्य राहिली.
बुल्सचा संघ या लढतीत बचावाच्या निकषावर कमकुवत राहिला असला तरी त्यांनी मोक्याच्या क्षणी अभिषेक सिंगला बाद करण्यात यश मिळवले होते. पुढे मुम्बाचा कर्णधार फजल अत्राचलीने सामन्याच्या 35 व्या मिनिटाला चंद्रन रंजितला बाद केले. हा त्याचा सामन्यातील पहिला गुण होता. यानंतर व्ही. अजितने सुपर रेड करत मुंबईची आघाडी भक्कम केली. शिवाय, अभिषेक सिंगला देखील रिवाईव्ह केले होते.
बेंगळूर बुल्ससाठी कर्णधार पवन सेहरावतचे सातत्याने बाद होणे फटका देणारे ठरले. तो सामन्यात 5 पेक्षा अधिक वेळा बाद झाला. सामन्याच्या 38 व्या मिनिटाला यू मुम्बाने बेंगळूर बुल्सला तिसऱयांदा ऑलआऊट केले आणि येथेच बेंगळूरचे विजयाचे उरलसुरले मनसुबे देखील धुळीस मिळाले.









