बांगला देशच्या मंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान
ढाका / वृत्तसंस्था
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधी केलेली कथित विधाने हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, असे महत्वपूर्ण विधान बांगलादेशचे सूचना आणि प्रसारण मंत्री हसन मुहम्मद यांनी केले आहे. बांगलादेशचे सरकार या विषयावर पळ काढीत आहे, या आरोपाचा त्यांनी इन्कार केला.
नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही वृत्तवाहिनीच्या चर्चेत मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात काही विधाने केल्याचा आरोप आहे. या विधानांवरुन भारतात आणि अनेक मुस्लीम देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अनेक मुस्लीम देशांनी भारत सरकारचा निषेध केला होता. भारतातही गेल्या शुक्रवारी अनेक ठिकाणी मुस्लिमांनी निदर्शने केली होती. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.
तथापि बांगला देश सरकारने या संबंधी निषेध केला नव्हता. तसेच बांगलादेशात या प्रकरणाची प्रतिक्रियाही फारशी उमटली नव्हती. बांगलादेशने या संबंधात भारताशी तडजोड करुन बोटचेपी भूमिका घेतली आहे, असा आरोप काही मुस्लीम संघटनांनी केला होता. या आरोपावर बांगलादेशचे मंत्री मुहम्मद यांनी स्पष्टीकरण दिले. हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याने आम्ही त्यात लक्ष घालण्याचे कारण नाही. भारताने शर्मा यांच्यावर त्वरित कारवाई केल्यामुळे आम्ही भारत सरकारचे अभिनंदन करतो, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
बांगलादेशात काही अतिरेकी गट आहेत. त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. तरीही ते अशी काही निमित्ते शोधून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. भारताशी आमचे संबंध अतिशय जवळचे आहेत. भारत सरकारची भूमिका आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आम्ही आततायी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.









