त्रास देणाऱया प्रियकराचा प्रेयसीनेच काढला काटा : संशयित दोन युवतीव तरूणाला दहा तासात जेरबंद
प्रतिनिधी /फोंडा
सांतिईस्तेव्ह-माशेल पुलाखाली इसमाच्या निघृणरित्या खूनप्रकरणी फोंडा पोलिसांनी ताबडतोब 10 तासाच्या आत छडा लावताना तीन संशयिताना अटक केली आहे. त्रास देणाऱया बिगरगोमंतकीय प्रियकर इसमाचा प्रेमप्रकरणातूनच प्रेयसीने खून केल्याचा प्राथमिक तपासाअंती स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मुख्य संशयित कॅब्रिना रॉड्रिगिझ (27, सांतिईस्तेव्ह), रूलाषा फर्नाडीस (23, खांडोळा माशेल) तसेच त्याचा प्रियकर सुनिल गजानन मडकईकर (32, चिंबल पणजी) यांना काल सोमवारी फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.
रविवार 31 ऑक्टो रोजी दुपारी 11 वा. सुमारास सांतिइस्तेव्ह माशेल पुलाखाली खूनाचा प्रकार उघडकीस आला होता. हरींदर प्रसाद (44, रा. अमेयवाडा माशेल, मूळ बिहार) याचा तिघाजणांनी निघृणरित्या खून केल्यानंतर सांतिइस्तेव्ह पुलाखाली त्याला टाकून देण्यात आले होते. मृतदेह ग्रामस्थाच्या नजरेस पडल्यानंत त्याला बेतकी आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. त्यानंतर फोंडा पोलिसांनाही गुंतागुंतीच्या ठरलेल्या व प्रथमदर्शनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून वाटणाऱया या प्रकरणाचा दिवस रात्र तपासाची चक्रे हलवीत यशस्वी छडा लावून खूनप्रकरणी तिघांही संशयिताना जेरबंद करण्यात यशस्वी कामगिरी बजावली आहे.
असा घडला खूनाचा थरार…. लाकडी दंडुक्यानी डोक्यावर प्रहार,
दुचाकीवर मयताला मधोमध बसवून आणले,पुलावरून खाली फेकले
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार पेमप्रकरणातून झाल्याचे आढळून आले आहे. मयत हरिंदर हा मागील काही महिन्यापासून संशयित कॅब्रिना रॉड्रिगिझ या युवतीबरोबर जवळीक साधली होती. तसेच तो तिच्याशी विवाह करण्यासंबंधी हट्ट करीत होता. तिने अन्य कुणा इसमाशी संबंध ठेवलेले त्याला आवडत नसे त्यासाठी तो वाट्टेल तशी पैशाची उधळण कॅब्रिनावर करीत होता. तसेच कुणाबरोबर दोत करून भांडण करण्यातही मागे पुढे बघत नव्हता. नेमक्या याच जबरदस्तीमुळे कॅब्रिना ही हरिंदरला कंटाळलेली होती. गरजेवेळी मदतीसाठी कॅब्रिना हिने आपला अन्य एक प्रियकर सुनिल याचा तिचा आपल्या अनेक कामासाठी उपयोग करून घेत असे. खूनाच्या घटनेच्या शनिवारी उशिरा रात्री मयत हरींदर तीला त्रास करू लागल्यानंतर तिने सुनिल याला बोलवून घेतले. कडाक्याचे भांडणानंतर कॅब्रिना, सुनिल यांनी लाकडी दंडुक्याने हरींदर यांच्या डोंक्यावर प्रहार करून त्याला अत्यवस्थ अवस्थेत आपल्या दुचाकीवर मधोमध बसवून कॅब्रिना व सुनिल याने सांतिइस्तेव्ह पुलावरून ढकलून खाली टाकले. याकामी त्यांना कॅब्रिनाची चुलत बहिण म्हणून ओळख सांगणारी रूलाषा फर्नाडीस यांनी मदत केल्याची कबूली दिल्याची पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर त्याला मारण्यासाठी वापरलेले लाकडी दंडुके आग लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही संशयितानी केला आहे. याप्रकरणी संशयितानी मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी जत्प करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फोंडा पोलिसांचे कौतुकास्पद दुहेरी यश
16 ऑक्टो रोजी फोडय़ातील पहिल्या दुहेरी हत्याकांडाचा यशस्वी छडा लावल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसानंतर माशेल येथील खूनाचा छडा त्याच टिमने केवळ दहा तासात छडा लावून कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. फोंडा पोलिसांनी या घटनेचा छडा लावताना संशयित कॅब्रिना व सुनिल यांचे फोंनवरील कॉलचा महत्वाचा धागेदोरे ठरले. या मोहीमेत दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक पंकजकुमार सिंग, उपअधिक्षक उदय परब, फोंडय़ाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी, आदित्य नाईक गावकर, महिला उपनिरीक्षक रश्मी भाईडकर, सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र गावडे, विनोद साळूंके हवालदार केदारनाथ जल्मी, हनुमंत बोरकर, वंदेश सतरकर, अमेय गोसावी, सिद्धेश गावस, आदित्य नाईक व टिमने छडा लावण्यात महत्वाची कामगिरी बजावली. बांबोळी येथील गोमेकॉत शवचिकित्सा अहवालानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. डोक्यावर झालेल्या प्रहारामुळे व अतिरक्तत्त्तावामुळे त्या इसमाचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी तिन्ही संशयिताविरोधात भा.द.सं. 302 कलमाखाली गुन्हा नोंदवून सात दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.









