वृत्तसंस्था/ पॅरीस
येथे रविवारपासून सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड 33 वर्षीय नोव्हॅक जोकोव्हिच जेतेपदासाठी ‘फेवरिट’ मानला जातो, असे वैयक्तिक मत माजी विजेता टेनिसपटू मॅट्स विलँडरने व्यक्त केले आहे.
सदर ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा येथील रोलाँ गॅरो टेनिसकोर्टवर खेळविली जाणार असून सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोव्हिचने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत केवळ एकदाच ही स्पर्धा जिंकली आहे. आता तो दुसऱयांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. 2020 च्या टेनिस हंगामामध्ये जोकोव्हिचची कामगिरी दर्जेदार झाली आहे. त्याने आतापर्यंत 33 सामने जिंकले असून केवळ एक सामना गमविला आहे. जोकोव्हिचने आतापर्यंत 17 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. आता तो 18 वे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविण्याचा प्रयत्न करेल.
या स्पर्धेत स्पेनचा नदाल हा त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जातो. नदालने या स्पर्धेच्या इतिहासात आपले वर्चस्व राखताना तेरा वेळा या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे. अलिकडे जोकोव्हिचने रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद जिंकून आपण पूर्ण तंदुरूस्त असल्याचे संकेत दिले. रविवारपासून सुरू होणाऱया पेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत जेतेपदासाठी जोकोव्हिक फेवरिट असल्याचे मत युरो स्पोर्टस्चे तज्ञ आणि सातवेळा ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविणारे विलँडर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
नदालने 2005 साली पहिल्यांदा पेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्याने या स्पर्धेत आपली मक्तेदारी राखली आहे. बेसलाईन खेळावर भर देणाऱया टेनिसपटूला या स्पर्धेत चांगले यश मिळू शकेल. मात्र जोकोव्हिचचा भर ताकदीच्या फटक्यावर आहे. नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 19 तर जोकोव्हिचने 17 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे सर्वाधिक मिळविणाऱया पुरूष टेनिसपटूंच्या यादीत स्वीसच्या फेडररचा विक्रम अद्याप अबाधित आहे. फेडररने 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून तो यावेळी प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत खेळणार नाही.









