वृत्तसंस्था/ पॅरिस
कॅनडाचा पुरुष टेनिसपटू मिलोस रेऑनिक तसेच स्वित्झर्लंडची महिला टेनिसपटू बेलिंडा बेन्सिक यांनी येत्या रविवारपासून येथे सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. 2020 च्या टेनिस हंगामातील ही शेवटची ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा आहे. गुरुवारी या स्पर्धेचा प्रमुख ड्रॉ काढण्यात आला.
एटीपी क्रमवारीत सध्या 20 व्या स्थानावर असलेल्या कॅनडाच्या रेऑनिकने गेल्या आठवडय़ात इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शविला होता. पण त्याला या स्पर्धेत दुसऱया फेरीतच पराभूत व्हावे लागले. त्याचप्रमाणे रोममध्ये झालेल्या या स्पर्धेत स्वीत्झर्लंडची बेन्सिक हिलाही दुसऱया फेरीतील सामन्यात हार पत्करावी लागली होती. येत्या रविवारपासून सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत कोरोनाच्या भीतीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंनी माघार घेतली आहे. या माघार घेणाऱया खेळाडूंमध्ये विद्यमान विजेती ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी, अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम विजेती जपानची नाओमी ओसाका, तसेच बियान्का आंदेस्क्मयू यांचा समावेश आहे. स्पेनच्या फर्नांडो व्हर्डेस्कोने आपण या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. प्रेंच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा प्रत्येक वषी मे-जून दरम्यान घेतली जाते. पण यावेळी कोरोना समस्येमुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. आता ही स्पर्धा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू होईल.









