प्रतिनिधी/ पणजी
वीज खात्यातर्फे प्रीपेड वीज मीटर्स बसवण्याच्या शक्यतेवर विचार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्य सचिव व इतर सचिवांच्या बैठकीतून बोलताना दिली. सचिवांच्या बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
वीजबिले उशिरा मिळतात व ग्राहकांना ती भरताना अडचणी येतात या विषयावरील चर्चेत डॉ. सावंत यांनी प्रीपेड वीज मीटर्स प्रस्ताव बोलून दाखवला.
वीज खात्याच्या मीटर रिडर्सना विधानसभा निवडणूक तसेच व्यवस्थापनासाठी अतिरिक्त कामे देण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांना वीजबिले देण्यास उशीर झाल्याचा खुलासा वीज खात्यातर्फे करण्यात आला. राज्य सरकारच्या विविध खात्यांचे डिजिटायझेशन करावे अशी सूचना डॉ. सावंत यांनी केली. विविध खात्यांच्या अनेक प्रकल्पांचा आढावा सचिवांकडून घेण्यात आला.
अनेक सचिवांनी त्यांच्या खात्याचे प्रश्न मांडले, समस्या ऐकवल्या त्यावर त्वरित तोडगा काढून त्या सोडवण्याचे निर्देश डॉ. सावंत यांनी सचिवांना, संबंधित अधिकारीवर्गास दिले. ‘दृष्टी’ च्या सेवेबद्दल त्यांनी समाधान प्रकट करून पर्यटक प्रवासी यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.









