प्रतिनिधी / सातारा :
साताऱयाचे खासदार श्रीनिवास पाटील यांची कार्यशैली त्यांनी राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. जिह्याचे खासदार म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी जिह्याच्या विकासासाठी जनतेला साद घातली आहे. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जिह्यातील प्रलंबित विकासकामे व जनहिताच्या विषयासंबंधी केंद्र शासनाच्या विविध मंत्रालये व विभागांत करावयाच्या मागण्या अथवा पाठपुरावा याबाबत लिखीत स्वरुपात प्रश्न त्यांच्या कार्यालयास कळविण्याचे आवाहन सातारकरांना केले आहे. त्यासंबंधी येत्या अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार श्रीनिवास पाटील यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
सातारा जिह्याला पंधरा वर्षानंतर श्रीनिवास पाटील हे तिसऱयांदा खासदार म्हणुन लाभले. त्यांची 1999 ते 2009 दरम्यानची खासदारकीची कारकीर्द चांगलीच गाजली. त्यांनी त्याच्या कर्याकाळात कराड दक्षिण लोकसभा मतदार संघात केलेल्या विकासकामांमुळे ते नेहमीच येथील जनतेला अदरणीय राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम पाहिले. दरम्यान, तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे विकासकामे करण्यासाठी भाजपवासी झाल्याने सातारा लोकसभेसाठी पुन्हा एकदा निवडणूक लागली. यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उदयराजेंना तोडीचा उमेदवार देण्यासाठी पुन्हा आपल्या महाविद्यालयीन मित्र श्रीनिवास पाटील यांना सातारा लोकसभा लढविण्यासाठी साद घातली आणि ते प्रचंड मतांनी निवडून आले.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून सातारकरांनी पुन्हा एकादा त्यांच्यावर विश्वास टाकला. तोच विश्वास सार्थ ठरविण्यासाठी खासदार पाटील हे निवडून आलेल्या दिवसापासून सातारा जिह्याच्या विकासकामांसाठी वयाचे बंधन तोडून तळमळिने काम करीत आहेत. त्याचा प्रत्यय संपूर्ण साताराकरांना गेल्या दोन महिन्यांपासून आला आहे. त्यानंतर आता जिह्याचे प्रश्न सोडविण्याकरीता खासदार पाटील यांनी आता प्रिय सातारकर… म्हणत नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत समस्या कळविण्याचे आवाहन केले आहे.









