मुंबई / ऑनलाईन टीम
विधिमंडळ सभागृहात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत शिष्टाचार मोडल्याच्या कारणावरुन भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. राज्याच्या राजकिय पटलावर याचे मोठे पडसाद उमटत आहेत. यावरुन सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये ही आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी या कारवाई विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कारवाईचा निषेध करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यालाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेल्या कारवाईचा दाखला देत प्रतिउत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, प्रिय देवेंद्रजी तुम्ही हे कसं विसरू शकता, याच सभागृहात २२ मार्च २०१७ रोजी १९ आमदारांना (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) गैरवर्तना बद्दल निलंबित करण्याचा प्रस्ताव संमत झाला होता. हिंमत दाखवा आणि म्हणा तुमची १९ संख्या ही १२ पेक्षा जास्त आहे, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी या कारवाईचं समर्थन करत सभागृहाला शिस्त लावण्यासाठी आमदारांच निलंबन झालं असावं असे म्हटले आहे. शीस्त पाळली नाही तर सभागृहात दंगली होतील, पाकिस्तान असो अथवा य़ुपी, बिहार यांच्या विधानसभेत अनेकवेळा आम्ही अशा दंगली होताना पाहिल्या आहेत. महाराष्ट्रात अशा प्रथा पडू नयेत यासाठी विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचे मी समर्थन करतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.