बेतकी आरोग्य केंद्रातर्फे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
वार्ताहर/ माशेल
बेतकी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रियोळ मतदारसंघातील चार ग्रामपंचायतींमध्ये सहा डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. ब्रॅण्डा पिंटो यांनी दिली आहे. राज्यात डेंग्यूचा फैलाव वाढत असून गेल्या काही दिवसांपासून बेतकी आरोग्य केंद्रातही या रोगाची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्याने आरोग्य खात्याकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत.
माशेल, खांडोळा, अडकोण, सांतइस्तेव व सावईवेरे भागात हे रुग्ण आढळून आले आहेत. डासांमुळे डेंग्यूचा फैलाव होत असल्याने संबंधित परिसरात धुराची फवारणी करण्यात आली आहे. तसेच रुग्ण आढळलेल्या ठिकाणी लोकवस्तीमध्ये उघड्यावर पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच स्वच्छतेसंबंधी दक्षता बाळगण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. याशिवाय डेंग्यूची लक्षणे व हा रोग फैलावण्यामागील कारणे या विषयी वाड्यावाड्यावर जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जनजागृती सुरू करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास त्यांनी हा आजार अंगावर न काढता आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करून घेण्याचे आवाहनही आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आले आहे.









