वार्ताहर /माशेल
प्रियोळ प्रगती मंचतर्फे गोवा मेडीकल कॉलेज रक्तपेढीच्या सहकार्याने मंगेशी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन नुकतेच घेण्यात आले. सुमारे दोनशे रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून प्रियोळ मतदारसंघाचे आमदार तथा क्रीडा मंत्री गोविंद गावडे उपस्थित होते. यावेळी त्याच्यासमवेत प्रियोळ प्रगती मंचचे अध्यक्ष युगांक नाईक, प्रियोळच्या सरपंचा हर्षा गावडे,बेतकी खांडोळय़ाचे सरपंच विशांत नाईक, जयेश नाईक व इतर पंचायतीचे सरपंच, पंच उपस्थित होते.
मंत्री गावडे यांच्याहस्ते दिप प्रज्जवलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले की प्रियोळ प्रगती मंच दरवर्षी शिबिराचे आयोजन करीत असून कित्येक गरजूंना मदतीचा हात दिलेला आहे. रक्त हे कारखान्यात निर्मित होत नसून रक्तदात्यांनी रक्त दान केल्यास कित्येक रूग्णांचे प्राण वाचू शकतात. शिबिरात सहभागी झालेल्या शेकडो युवक-युवतींचे त्यांनी अभिनंदन केले. प्रगती मंच फक्त रक्तदान शिबिर आयोजित करीत नसून कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातही ते नेत्रदीपक काम करीत आहे. याचे शेयही त्यांनी प्रियोळ प्रगती मंचाच्या कार्यकर्त्यांना दिले. कोविड काळात खंड पडलेल्या रक्तदान शिबिर व इतर समाजपयोगी उपक्रम राबविण्यासाठी मंच पुन्हा सक्रीय होणार असल्याची ग्वाही मंत्री गावडे यांनी यावेळी दिली.
सरपंच हर्षा गावडे म्हणाल्या की प्रियोळ प्रगती मंचचे कार्य संपुर्ण प्रियोळ मतदारसंघात व्यापलेले असून मंत्री गोविंद गावडे मंचाच्या कार्यकर्त्यासमवेत स्वतः कार्यरत असतात. संस्थेचे अध्यक्ष युगांक नाईक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.









