प्रियोळ प्रगती मंचचे आयोजन
प्रतिनिधी /फोंडा
प्रियोळ मतदारसंघात गेल्या पाच वर्षांमध्ये स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी राबविलेल्या विकासकामांच्या कामगिरीचे मूल्यांकन लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून लघुपट व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दोन्ही स्पर्धा प्रियोळ मतदारसंघातील विकासकामांवर आधारित असून गोव्यातील कुठलाही स्पर्धक त्यात सहभागी होऊ शकतो, असे प्रियोळ प्रगती मंचतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मंचचे निमंत्रक युगांक नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मंचचे अध्यक्ष सर्वेंद्र फडते गावकर, सदस्य उमेश गावडे, आरती गावडे व सुषमा गावडे उपस्थित होते. प्रियोळ प्रगती मंच ही संस्था प्रियोळ मतदारसंघात शिक्षण, आरोग्य व कृषी क्षेत्रात कार्य करीत आहे. सन 2017 सालच्या निवडणुकीत मंत्री गोविंद गावडे यांना स्वतंत्र उमेदवार म्हणून पाठिंबा देताना प्रियोळ मतदारसंघासाठी मंचने जो जाहीरनामा तयार केला होता, त्यापैकी बहुतेक विकासकामे या पाच वर्षांत पूर्ण झाली आहेत. या पाच वर्षांतील विकासकामांचे मूल्यांकन एका स्वतंत्र संस्थेमार्फत केले जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून लघुपट व निबंध लेखन स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी लघुपट पाच ते सात मिनिटांचा असावा. कोकणी, मराठी किंवा इंग्रजी भाषेत तो तयार करता येईल. सन 2017 पासून प्रियोळ मतदारसंघात जी विकासकामे झाली आहेत, त्यावर हा लघुपट तयार करावा लागणार असून त्यात स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आवश्यक आहेत. लघुपटासाठी शिक्षण, कृषी व जलसिंचन, आरोग्य, रस्ते, वीज व पाणी हे विषय असतील. 14 वर्षांवरील गोव्यातील कुठलाही स्पर्धक त्यात भाग घेऊ शकतो. विजेत्यांना प्रथम रु. 25000, द्वितीय रु. 20000, तृतीय 15000, तसेच रु. 10000ची चार उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. दि. 6 डिसेंबरपर्यंत लघुपट तयार करून पाठविणे आवश्यक आहे.
निबंध स्पर्धेचा विषय ‘माझ्या मताचा जाहीरनामा’ हा असून त्यात प्रियोळ मतदारसंघातील समस्या, स्थिती व त्यावरील निवारणाचा आढावा घ्यावा लागेल. निबंध दीड हजार ते दोन हजार शब्द मर्यादेत असावा. 14 वर्षांवरील गोव्यातील स्पर्धक त्यात भाग घेऊ शकतात. विजेत्यांना प्रथम रु. 5000, द्वितीय रु. 3000, तृतीय रु. 2000 व रु. 1000 ची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांना आपल्या निबंधाची प्रत दि. 6 डिसेंबरपर्यंत आयोजकांपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी (9022902558) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









