अनैतिक संबंधात अडसर म्हणून काढला काटा
प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील कोंडवेनजीक असलेल्या फरासवाडी येथे अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या एकाचा त्याच्या पत्नीच्या प्रियकराने धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयिताने मृतदेह कालव्यात फेकून दिला. खून झालेल्या व्यक्तीचे नाव फिरोज चाँद मुलाणी असे असून त्याच्या खून प्रकरणी संशयित म्हणून एलसीबीने केवळ बारा तासात शकील निजाम फरास ( वय 42, रा नेले ता. सातारा) याला 12 तासात अटक केली असून त्याने गुह्याची कबुली दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिरोज मुलाणी हा मूळचा सांगली जिह्यातील कडेगावचा. त्याची सासुरवाडी सातारा तालुक्यातील फरासवाडी. तो सासुरवाडीमध्येच कुटूंबियांसमवेत राहत होता. मंगळवारी रात्री त्याचा खून अज्ञात व्यक्तीने करून कालव्यात मृतदेह टाकल्याची माहिती त्याच्या भावाला पोलिसांनी कळवताच त्याचा भाऊ लगेच फरासवाडीत पोहोचला. रात्रीच लगेच पोलिसांनी फिरोजचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात आणले. तोपर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गावात व घटनास्थळी जाऊन चौकशी करून काही धागेदोरे हाती लागते का याची चौकशी केली.
एलसीबीचे पथकास एका व्यक्तीने खून केल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. त्यावरून शकील फरास याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. फिरोजच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्यास फिरोज हा विरोध करत होता. त्यामुळे फिरोजचा धारधार शस्त्राने खून केल्याचे पोलिसांना त्याने सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, सह पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, अभिजित चौधरी यांच्यासह सातारा तालुका व स्थानिक गुन्हे शाखेच्या जवानांनी केली.









