रायबरेली किंवा अमेठीतील मतदारसंघ चर्चेत – उत्तर प्रदेशातील प्रचारमोहिमेचे नेतृत्त्व
वृत्तसंस्था/ लखनौ
पुढील वर्षी होणाऱया उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महासचिव आणि उत्तरप्रदेश प्रभारी प्रियंका वड्रा रायबरेली किंवा अमेठीतील एखाद्या मतदारसंघातून मैदानात उतरू शकतात. विधानसभा निवडणूक लढविणाऱया त्या गांधी परिवाराशी संबंधित पहिल्या सदस्य ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी गांधी परिवाराच्या सर्व सदस्यांनी केवळ लोकसभा निवडणूक लढविली आहे.
प्रियंका यांची पहिली पसंती अमेठी मतदारसंघाला आहे. कारण तेथे राहुल गांधी यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी यातून मिळू शकते. याच्या माध्यमातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांना आव्हान देण्याची तयारी करण्याचा त्यांचा विचार आहे.
प्रशांत किशोरांची सूचना
निवडणुकीच्या मैदानात प्रियंका वड्रा उतरल्यास काँग्रेसला उत्तरप्रदेशात नवी ऊर्जा मिळेल, असे लखनौमध्ये अलिकडेच पार पडलेल्या बैठकीत सल्लागार समितीने सांगितले होते. निवडणूक व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांनीही प्रियंका यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची सूचना केली होती.
काँग्रेसने कसली कंबर
प्रियंका वड्रा यांनी निवडणूक लढविण्याबाबत स्वतः कुठलेच संकेत दिलेले नाहीत. पण प्रियंका यांच्या कार्यालयाकडून निवडणूक तयारी सुरू करण्यात आली आहे. याकरता रायबरेली आणि अमेठीचा डाटा जमविला जात आहे.
रायबरेली किंवा अमेठीच का?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीत राहुल गांधी पराभूत झाल्यावर तेथील गांधी परिवाराचा प्रभाव कमी झाला आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्याने रायबरेलीतही गांधी परिवाराचा जनतेशी असलेला संपर्क घटला आहे. अशा स्थितीत प्रियंका यांनी निवडणूक लढविल्यास अमेठी आणि रायबरेलीतील पक्षाची स्थिती बळकट करता येऊ शकते. रायबरेली आणि अमेठी हा गांधी परिवाराचा बालेकिल्ला राहिला आहे. उत्तरप्रदेश निवडणुकीत प्रियंका याच काँग्रेसच्या चेहरा असतील, असे विधान काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी यापूर्वीच केले आहे.
रायबरेली अन् काँग्रेस
रायबरेलीत 1952 पासून 2019 पर्यंत लोकसभा निवडणुकीत केवळ तीनवेळा काँग्रेस पराभूत झाला आहे. 1977, 1988 आणि 1996 मध्ये या मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाला होता. या मतदारसंघातून फिरोज गांधी, इंदिरा गांधी, शीला कौल, अरुण नेहरू आणि सतीश शर्मा यांनी विजय मिळविला होता.
अमेठी अन् काँग्रेस
अमेठीत 17 लोकसभा आणि 2 पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने 16 वेळा विजय मिळविला आहे. केवळ तीनवेळा 1977, 1998 आणि 2019 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. 1977 मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला पहिल्यांदा हार पत्करावी लागली होती. त्यानंतर 1980 मध्ये संजय गांधी येथून खासदार झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल यांना स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागला होता.









