काँग्रेस कॅम्पेनच्या महिला सदस्याचा दावा
वृत्तसंस्था/ लखनौ
काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ कॅम्पेन पोस्टरमध्ये सर्वात पुढे उभ्या असलेल्या महिलेला उमेदवारी मिळू शकलेली नाही. काँग्रेसच्या शक्ति विधान महिला घोषणा पत्राची पोस्टरगर्ल डॉ. प्रियांका मौर्य यांनी लाच न देता आल्याने लखनौच्या सरोजनीनगर मतदारसंघातील माझी उमेदवारी रद्द करून रुद्र दमण सिंह यांना देण्यात आल्याचा आरोप केला आहे. प्रियंका वड्रा यांचे सचिव संदीप सिंह यांनीच ही लाच मागितली होती असा दावाही त्यांनी केला आहे.
उत्तरप्रदेश काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या डॉ. प्रियांका मौर्य यांनी सरोजनीनगर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी दावा केला होता. प्रियंका वड्रा यांच्या लडकी हूं, लड सकती हूं मोहिमेत त्या सामील होत्या. इतकेच नाही तर काँग्रेसने शक्ति विधान नावाने प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्राच्या त्या पोस्टर गर्ल होत्या.
काँग्रेसने गुरुवारी 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात आश्वासनानुसार 40 टक्के महिलांना सामील करण्यात आहे. तर सरोजनीनगर मतदारसंघात रुद्र दमन सिंह यांना उमेदवारी मिळाली आहे. यादी प्रसिद्ध झाल्याच्या काही तासांतच डॉ. प्रियांका मौर्य यांनी ट्विट करत काँग्रेसमध्ये तिकिटांचा व्यापार होत असल्याचा आरोप केला आहे.
प्रियंका वड्रा यांचे सचिव संदीप सिंह यांनी तिकिटाच्या बदल्यात पैसे देण्यासाठी एका व्यक्तीच्या माध्यमातून फोन करविला होता. रक्कम न दिल्याने माझ्याजागी दुसऱया व्यक्तीला उमेदवारी देण्यात आल्याचे डॉ. प्रियांका यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष महिला आणि तरुणाईला पुढे करण्याच्या आडून पैशांची वसुली करत आहे. पूर्वी लडकी हूं, लड सकती हूं मॅराथॉनमध्ये गर्दी जमविण्याच्या नावावर माझ्याकडून पैसे उकळण्यात आले. त्यानंतर प्रियंका वड्रा यांच्या जन्मदिनी पैशांची मागणी करण्यात आली. मग उमेदवारीसाठी रक्कम मागण्यात आली. या प्रत्येक आरोपाचा माझ्याकडे ठोस पुरावा असून तो लवकरच उघड करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









