सांगरूळ / वार्ताहर
सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव व कोल्हापूर जिल्हा संस्थाचालक संघाचे सचिव प्रा .जयंत आसगावकर यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदार संघातून प्रचंड बहुमताने विजय झाले बद्दल कुंभी कासारी परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्राध्यापक जयंत आसगावकर यांचे परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी सलोख्याचे व मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हा विजय मोठ्या दिमाखात साजरा केला आहे .
प्राध्यापक जयंत आसगावकर यांना महा विकास आघाडीची उमेदवारी मिळाल्यापासून कुंभी कासारी परिसरातील गावांमधील त्यांचे समर्थक असलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यामधून उत्साहाचे वातावरण पसरले होते. स्वर्गीय गुरुवर्य डी डी आसगावकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे परिसरातील गावांमधून घडलेले त्यांचे अनेक माजी विद्यार्थी आज राजकीय क्षेत्रात विविध ठिकाणी शासकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. संस्थेचे शिक्षक व कर्मचारी ही बहुतांशी परिसरातील गावांमधीलच असल्याने सांगली परिसरातील या गावांमधील अनेक कार्यकर्त्यांनी प्रचाराच्यानिमित्ताने पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर जिल्हा पिंजून काढला होता .
संस्थेचे शिक्षक कर्मचारी माजी विद्यार्थी उस्फूर्तपणे प्रचार यंत्रणेत सहभागी झाले होते. यामुळे कुंभी कासारी परिसरात निवडणूक मे वातावरण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पालकमंत्री सतेज पाटील नामदार विश्वजित कदम, आमदार हसन मुश्रीफ, नामदार सावंत संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने आमदार पी एन पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजू बाबा आवळे यांचेसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्त्यांचे उपस्थितीत शिक्षकांचा मेळावा महासैनिक दरबार हॉल येथे झाल्यापासून निवडणुकीचे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. मेळाव्यात नेत्यांच्या झालेल्या उस्फुर्त भाषणामुळे कार्यकर्त्यांचे चैतन्याचे वातावरण पसरले होते त्यामुळे परिसरातील कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचार यंत्रणा हातात घेतली होती.
प्रत्येक जण उस्फूर्तपणे नियोजनात आघाडीवर राहत होते. मतदान दिवशीही पाचही जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. पक्षीय पातळीवर प्रथमच निवडणूक झाल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला होता त्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती .
पुणे ते झालेल्या मतमोजणीचा कल समजेल तसा उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत कुंभी कासारी परिसरातून मोटरसायकल रॅली काढत जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी कुंभी-कासारी कार्य स्तरावरील राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यानंतर स ब खाडे महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या गुरुवर्य स्वर्गीय डी. डी. आसगावकर यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून सांगरूळ येथे रेल्वे आल्यानंतर दूध वाटप करून रॅलीची सांगता करण्यात आली.
सांगरुळचे जेष्ठ नेते स्वर्गीय मारुतराव धोंडीबा खाडे यांनी १९७७ ला काँग्रेस पक्षाकडून सांगरुळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना थोडक्या मतांनी पराभूत व्हावे लागले होते. या नंतर तब्बल ४३ वर्षानंतर प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या रूपाने सांगरूळ गावचा विधानपरिषदेत आमदार होण्याची संधी मिळाली. यामुळे सांगरुळसह संपूर्ण कुंभी कासारी परिसरातील गावांमधून प्राध्यापक आसगावकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी हा विजय मोठ्या उत्साहात साजरा केला.
शनिवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सांगरुळ येथे आगमन होणार असून विधान परिषदेतील विजयाप्रीत्यर्थ गावात त्यांची विजयी मिरवणूक आयोजित केला आहे.