लोकायुक्त पोलीस प्रमुख यशोदा वंटगोडी यांचे मत
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारी काम म्हणजे देवाचे काम आहे. त्यामुळे अत्यंत प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने आपण सारे आपले कर्तव्य केले तरच भ्रष्टाचाराचे निर्मुलन करणे शक्मय आहे, असे लोकायुक्त पोलीस प्रमुख यशोधा वंटगोडी यांनी सांगितले.
सुवर्णविधानसौध येथे गुरुवारी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांसाठी जागृती सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना यशोदा वंटगोडी म्हणाल्या, जनसेवेसाठी सरकारने आपली नियुक्ती केली आहे. आपल्यावर जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तरच सरकारी योजना समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचणार यात संशय नाही.
प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱयांनी प्रामाणिकपणे सेवा बजावावी. सरकारने दिलेली जबाबदारी पार पाडताना भ्रष्टाचार निर्मुलनासाठी प्राधान्य द्यावे. पैसा, मालमत्तेच्या मागे लागल्यास एक ना एक दिवस त्याची किंमत मोजावी लागणार आहे, असे आवाहनही यशोदा वंटगोडी यांनी केले.
यावेळी माहिती हक्क आयोगाच्या आयुक्त बी. व्ही. गीता, चतुर्थ अतिरिक्त जिल्हासत्र व विशेष न्यायालयाचे सरकारी वकील प्रवीण अगसगी, पोलीस उपअधिक्षक बी. एस. पाटील, पोलीस उपअधिक्षक जे. रघु आदी उपस्थित होते. 22 सरकारी खात्यांचे अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमात भाग घेतला होता. एम. एस. तीर्थ यांनी सुत्रसंचालन केले. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकातील उदय यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. पोलीस निरीक्षक रफीक तहसीलदार यांनी आभार मानले.









