तारखेची घोषणा लवकरच : सरकारी पदवी, डिप्लोमा, अभियांत्रिकी प्राध्यापकांची बदली : 15 टक्के प्रमाण निश्चित
प्रतिनिधी / बेंगळूर
सरकारी पदवी, अभियांत्रिकी आणि डिप्लोमा महाविद्यालयीन प्राध्यापकांची बदली प्रक्रिया कौन्सिलिंगद्वारे होणार आहे. एकूण अध्यापक कर्मचाऱयांपैकी 15 टक्के बदल्या करण्यात येतील. पदवी आणि तांत्रिक महाविद्यालयीन कर्मचाऱयांच्या बदल्यांसाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
एकाच ठिकाणी चार वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावत असलेले प्राध्यापक बदलीसाठी पात्र आहेत. हा मुद्दा आधारभूत मानून बदल्यांचे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत निर्धारित करण्यात आले आहे. पदवी आणि तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱया प्राध्यापकांना हा नियम लागू आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱया प्राध्यापक बदल्यांच्या प्रक्रियेला लवकरच चालना मिळणार आहे. शक्य तितक्या लवकर बदल्यांसाठी कौन्सिलिंग घेण्याची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी राज्यात अ, ब, क, ड आणि इ असे पाच विभाग करण्यात आले आहेत. बेंगळूर महापालिका कार्यक्षेत्र अ विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. तर राज्यातील इतर महानगरपालिका ब विभागात, जिल्हा आणि नगरपालिका कार्यक्षेत्र क विभागात, तालुका केंद्र आणि नगरपंचायतींमधील महाविद्यालये ड विभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. वरील सर्व विभाग वगळता उर्वरित भागातील महाविद्यालये इ विभागात निवडण्यात आले आहे. ज्या भागात चार वर्षे सेवा बजावलेली आहे, असे प्राध्यापक दुसऱया विभागात बदली करून घेण्यास पात्र ठरतात, अशी माहितीही उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
बदल्यांचे प्रमाण असे…
राज्यातील सरकारी पदवी, डिप्लोमा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये काम करीत असलेल्या एकूण अध्यापक कर्मचाऱयांपैकी 9 टक्के जणांची सक्तीने बदली केली जाईल. पती-पत्नींना जवळच्या महाविद्यालयांत बदली करण्याचे प्रमाण 3 टक्के प्रमाण निर्धारित करण्यात आले आहे. तसेच विधवा, घटस्फोट घेतलेल्या महिला प्राध्यापक, दिव्यांगांची जबाबदारी असणारे, कुटुंबातील व्यक्ती सैन्य किंवा निमलष्करी दलात काम करीत असलेल्या प्रकरणांमध्ये 1 टक्का, दिव्यांग प्राध्यापकांसाठी 1 टक्का आणि आरोग्यविषयक गंभीर समस्या असणाऱयांची 1 टक्का प्रमाणात बदल्या करण्यात येतील, असेही डॉ. अश्वथ नारायण यांनी सांगितले.
बदल्या पारदर्शकपणे
प्राध्यापकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्याचा हेतू सरकारचा आहे. 4 वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या अध्यापक कर्मचाऱयांची सक्तीने बदली करण्यात येईल. त्यासंबंधीचे नियमही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यापूर्वी बदल्या म्हणजे मोठा गोंधळ होता. मात्र, आता संपूर्ण व्यवस्था सुधारित केली आहे. ऑनलाईनद्वारेच ही प्रक्रिया चालविली जात आहे. प्राध्यापकांना यापुढे मंत्री, आमदार, अधिकाऱयांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाही. कौन्सिलिंगद्वारेच बदल्या करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.









