प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली या संघटनेच्या पदाधिकायांनी नुकतीच दापोली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांची भेट घेऊन दापोली तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या सर्व समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली.
दापोली प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष जीवन सुर्वे, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस संदिप जालगांवकर, दापोली तालुका सरचिटणीस सचिन नावडकर, तालुका कार्याध्यक्ष गणेश तांबिटकर, तालुका प्रसिद्धी प्रमुख बाबू घाडीगांवकर, दत्ताराम गोरीवले यावेळी उपस्थित होते. सोशल डिस्टसिंग व कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून ही भेट घेण्यात आली. चट्टोपाध्याय वेतनश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी संदर्भातील शिक्षकांच्या प्रस्तावांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील लाभार्थी शिक्षकांचे चट्टोपाध्याय व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव पूर्ण करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरात सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत पाठविण्यात येतील अशी माहिती गट शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी दिली.
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अपूर्ण सेवापुस्तकांच्या प्रश्नावर माहिती देताना गट शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले की, काही सेवापुस्तकांमधील नोंदी अपूर्ण आहेत. संबंधित शिक्षकांकडून अपूर्ण बाबींची माहिती घेण्यात येईल. लवकरच दररोज एक केंद्र याप्रमाणे सर्व शिक्षकांच्या सेवापुस्तकांतील नोंदी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येईल. याशिवाय मे महिन्यातील पंचवीस टक्के वेतन प्रलंबित रक्कम गणपती सणाआधी शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे गट शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. शिक्षकांच्या आंतरजिल्हा, जिल्हांतर्गत व तालुकांतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. तालुकांतर्गत शिक्षकांच्या विनंती बदल्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचीही माहिती गट शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी दिली. तालुका अध्यक्ष जीवन सुर्वे यांनी या भेटीत गट शिक्षणाधिकारी यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल समाधान व्यक्त करून तालुक्यातील सर्व शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुका सरचिटणीस सचिन नावडकर यांनी चर्चा करण्यासाठी वेळेचे समायोजन केल्याबद्दल संघटनेच्यावतीने गट शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांचे आभार मानले.









