अनेक प्रा.आ. केंद्रांतील कर्मचारे वर्चस्व वादात मग्न, वैद्यकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांमध्येही धुसफूस,रुग्णसेवेपेक्षा कुरघोड्यांमध्ये मानली जातेय धन्यता
कोल्हापूर / कृष्णात चौगले
प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे जिह्यातील ग्रामीण जनतेच्या आरोग्य सुविधेचे हक्काचे ठिकाण. केवळ पाच रूपयांच्या केसपेपरमध्ये तपासणीबरोबरच मोफत औषधे मिळत असल्यामुळे गोरगरीबांसाठी आधारवड ठरत आहेत. पण रुग्णसेवेपेक्षा कुरघोड्यांमध्ये धन्यता मानणाऱया काही कामचुकार कर्मचारी आणि अधिकाऱयांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे राजकारणाचा अड्डा बनत चालली आहेत. अनेक ठिकाणी कर्मचाऱयांमध्येच गटबाजी पहावयास मिळत असून काही ठिकाणी बेशिस्त कर्मचारी विरुद्ध वैद्यकीय अधिकारी असे चित्र आहे. यामुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत असून जिल्हा परिषद प्रशासनाकडून मात्र मनमानी कर्मचारी आणि अधिकाऱयांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र आहे.
अतिग्रे उपकेंद्रातील आरोग्य सेवक रमेश कोरवी यांनी उपकेंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी कोरवी यांनी वरिष्ठांकडून झालेल्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या घटनेमध्ये दोषी कोण ? हे पोलीस तपास आणि जिल्हा परिषदेच्या चौकशीमध्ये स्पष्ट होईल. पण या घटनेवरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयांच्या अंतर्गत कुरघोड्या मात्र चव्हाट्यावर आल्या आहेत. कोणतेही शासकीय कार्यालय असो, अथवा खासगी. तेथील अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱयांना काम सांगणे आणि त्यानुसार कर्मचाऱयांनी ते काम करणे हे प्रचलित आहे. कामाच्या पातळीवरून सुरु असलेल्या संवादाचे अनेक वेळा वादामध्येही रुपांतर होत असते. पण संबंधित अधिकारी आपल्याला असे का बोलले ? आणि आपण कामात आणि वागण्यात कोणता बदल केला पाहिजे ? हे कर्मचाऱयांनी ओळखणे आवश्यक आहे. त्यासाठी कुरघोड्यासह कोणताही टोकाचा निर्णय घेणे सर्वांसाठीच त्रासदायक ठरणारे आहे.
अनेक कर्मचाऱ्यांचा एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात तळ
अनेक आरोग्य कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच प्रा.आ.केंद्रात कार्यरत असल्याचे चित्र आहे. हे कर्मचारी विशेषत: त्या तालुक्यातील अथवा परिसरातील असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे घरोब्याचे संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे तेथील वैद्यकीय अधिकारी अथवा वरिष्ठ अधिकाऱयाने संबंधित कर्मचाऱयांना काम सांगणे अथवा कामचुकारपणाबद्दल जाब विचारणे हे त्यांना अपमानास्पद वाटते. यातून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी विरुद्ध बेजबाबदार कर्मचारी असा संघर्ष पहावयास मिळत आहे. यामध्ये चोराच्या उलट्या बोंबा' या म्हणीप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून वैद्यकीय अधिकाऱयांविरोधात मोहिम उघडली जात आहे. खोटेनाटे आरोप करून संबंधित अधिकाऱयास कसे हतबल करता येईल, त्यांची बदली कशी होईल ? यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जातात. अगदी जि.प.च्या आरोग्य विभागाकडून आलेल्या चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांना हे कर्मचारी सहजपणेमॅनेज’ करत असल्याची चर्चा आहे. परिणामी चोर सोडून संन्याशाला फाशी होत असल्यामुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे जि.प.प्रशासनाने प्रशासकीय नियमानुसार विहीत कालावधीनंतर कर्मचाऱयांची बदली करणे अपेक्षित आहे. तरच प्राथमिक आरोग्य केंद्रातील राजकारणाचे अड्डे उध्वस्थ होतील.
कर्मचाऱ्यांना `अधिकारशाही'चा त्रास
काही वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केवळ कागदोपत्री हजेरी लावत आहेत. दुपारनंतर गायब होणाऱया या अधिकाऱयांमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत जि.प.च्या सर्वसाधारण सभेमध्ये अनेक सदस्यांनी आवाज उठवल्यानंतरही संबंधित डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरुच आहे. आपला गलथान कारभार उजेडात येऊ नये यासाठी त्यांच्याकडून आरोग्य कर्मचाऱयांवरच दबावतंत्र करून अधिकारशाही गाजवली जाते. परिणामी कर्तव्यदक्ष कर्मचाऱयांना अधिकाऱयांच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्कृष्ठ रुग्णसेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱयांनी एक विचाराने काम करणे अपेक्षित आहे.
चौकशी हवी पारदर्शी
वैद्यकीय अधिकारी अथवा आरोग्य कर्मचाऱयांबाबत जि.प.च्या आरोग्य विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी समिती नियुक्त करून त्याची चौकशी केली जाते. यामधील चौकशी अधिकाऱयाने कोणताही पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन न ठेवता चौकशी करणे अपेक्षित आहे. अन्यथा चौकशी अधिकाऱयाचीच चौकशी करावी, अशी मागणी पुढे आली तर नवल वाटण्याची गरज नाही.
मतभेद नको, रुग्णसेवेला प्राधान्य द्या
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र म्हणजे एक कुटूंब आहे. तेथील अधिकाऱयांनी कुटूंब प्रमुख या नात्याने सर्व कर्मचाऱयांकडून काम करुन घेणे आवश्यक आहे. कर्मचाऱयांनीही आपले काम प्रामाणिकपणे करावे. आरोग्य केंद्रामध्ये कोणतेही मतभेद नसावेत. कोरोना महामारीच्या काळात सर्वांनी रुग्णसेवेला प्राधान्य देण्याची गरज आहे.- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.कोल्हापूर









