फोंडा वन्यजीव विभागाकडून दरवर्षी दिडशे ते दोनशे सापांची सुटका
प्रतिनिधी / फोंडा
पर्यावरण व वन्यजीवासंबंधी जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत नाग व इतर सरपटणाऱया प्राण्यांना मारुन टाकण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत. त्याचे श्रेय प्राणीमित्रांना द्यावे लागेल. सर्प किंवा नागाविषयी तर लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. सर्प हा विषारी असला तरी तो माणसांसाठी उपद्रवी मात्र निश्चितच नाही. फोंडा वन्यजीव विभागाच्या रेस्क्यू पथकाने गेल्या सात महिन्यात लोकवस्तीमध्ये आलेल्या साधारण 28 नागांना जीवदान दिले आहे.
फोंडा वन्यजीव विभागातील रेस्क्यू पथकाचे सर्पमित्र अली शेख यांची कामगिरी तर उल्लेखनीय अशीच आहे. गेल्या सात वर्षांत त्यांनी सातशे ते आठशेच्या आसपास विविध प्रकारच्या सापांना पकडून त्यांची सुरक्षित जागी सुटका केली आहे. त्यामध्ये बहुतेक कोब्रा म्हणजे नाग आहेत. वर्षभरात घरात किंवा लोकवस्तीमध्ये आलेल्या किमान दिडशे ते दोनशे सापांची ते सुटका करतात. अगदी विहिरीत पडलेल्या नागाला त्यांनी मोठय़ा शिताफिने आपला जीव धोक्यात घालून बाहेर काढले आहे. या सापांना हाताळताना त्यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेली भिती व गैरसमज दूर करण्याचे कामही त्यांच्याकडून होत असते. अली सांगतात, सापांच्या जातीमध्ये केवळ 4 प्रकारचे साप विषारी असतात. नाग हा विषारी असला तरी माणसांसाठी उपद्रवी मात्र नाही. गरम हवामानात म्हणजे जानेवारी ते मे दरम्यान आपले खाद्य शोधण्यासाठी नाग जास्त प्रमाणात बाहेर पडतात. उंदीर हे त्याच्या आवडीचे खाद्य असल्याने त्यांना शोधात तो लोकवस्तीपर्यंत येऊन पोचतो. घरासभोवताली शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ टाकून दिल्याने उंदिर वाढतात व या उदंराच्या शोधात साप घराच्या आसपास फिरकतात. खाद्याच्या शोधात किंवा प्रजननाच्यावेळी त्यांचा वावर खुल्या जागांवर आढळून येतो.
नाग डंख धरुन पाठलाग करतो हा निव्वळ भ्रम !
नागाला जिभेमुळे आसपासच्या हालचाली कळतात. एखाद्या नागाचे नैसर्गिक आयुष्य साधारण 18 ते 20 वर्षे असते. या प्राण्यामध्ये नर मादी सहसा ओळखता येत नाही. नागिण ही एका वेळी 15 ते 20 पिल्लांना जन्म देऊ शकते. नाग डंख धरुन माणसाचा पाठलाग करतो, यात कुठलेच तथ्य नाही. माणूस किंवा अन्य कुठलाही प्राणी त्याच्यासमोर आल्यास आपल्या सुरक्षेसाठी तो फणा उभारतो. क्वचित प्रसंगी दंशही करतो. त्यामुळे त्याला माणसांचा शत्रू म्हणता येणार नाही. पर्यावरणीय दृष्टय़ा जैविक साखळीतील तो अत्यंत महत्त्वाचा घटक असून ऍन्टीवेनमपासून कॅन्सरवरील किमो थेरेपीपर्यंत विविध प्रकारच्या औषधांसाठी नागाच्या विषाचा वापर होत असतो. दंतकथा व जुन्या चित्रपटामधून नागाविषयी बरेच गैरसमज पसरले आहेत. आजही बऱयाच लोकांच्या डोक्यात या प्राण्याविषयी हे गैरसमज कायम आहेत. नाग वारूळात राहतो, हा समजही तेवढासा खरा नाही. क्वचित प्रसंगी आपले खाद्य शोधण्यासाठी तो वारुळात प्रवेश करतो, असे अली सांगतात.
नागाला समजून घ्या…गैरसमज दूर होतील ः बेतकीकर फोंडा वन्यजीव विभागाचे अधिकारी दीपक बेतकीकर सांगतात, सर्प हा पर्यावरणाच्या जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र विविध प्रकारचे समज व गैरसमजातून पूर्वी त्याची हत्या करण्याचे प्रकार घडत होते. चित्रपटांमुळेही लोकजीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव होता. जुन्या काळातील नागिण, नागमणी, दूध का कर्ज, नगिना अशा बऱयाचशा चित्रपटांतून किंवा मालिकांमधून नाग या सापाविषयी वेगळाच गैरसमज माणसाच्या डोक्यात भिनला होता. चित्रपट हे केवळ मनोरंजन करणारे माध्यम असून त्यात वास्तवापेक्षा कल्पनेचाच भाग अधिक असतो, हे नेमके या प्राणाविषयी विसरले जाते. नाग मानुष्य जातीसाठी उपद्रवी नाही. पर्यावरणातील जैविक साखळी टिकून राहण्यासाठी अशा प्राण्यांचे जतन होणे आवश्यक आहे. भारतीय कृषी संस्कृतीमध्ये नागाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. या कृषी संस्कृतीचा भाग म्हणून श्रावण महिन्यात नागपंचमी म्हणजे नागाची पूजा केली जाते.









