अध्याय चौदावा
आसनजय साधण्यासाठी, उत्तम लक्षणांनी युक्त असे आसन तयार करावे. दर्भ, वस्त्र, कांबळी, कातडे, ह्यांनी तयार केलेले आसन घालावे. ते उंच किंवा सखल होऊ नये. चहूकडून सारखे असावे. ते कोमल आणि मऊ असावे. शुद्ध मुद्रा लावून वज्रासन किंवा कमलासन घालावे. अथवा ज्या आसनामध्ये मनाला आनंद वाटेल असे सहजासन घालावे. मग प्राणायामचा अभ्यास करावा. त्यात पूरक, कुंभक व रेचक करून लगेच रेचक, पूरक व कुंभक करणे अशा दोन्ही प्रकारचा अभ्यास झाला पाहिजे. इडेने म्हणजे डाव्या नाकपुडीने प्रथम वायु आत ओढून घ्यावा व तो तसाच राखून ठेवून नंतर तो तिनेच पुन्हा परत सोडावा असाही एक प्रकार आहे. तसेच उजव्या नाकपुडीने वायु आत घ्यावा आणि तिनेच तो परत सोडावा, असे दुसरेही एक प्राणायामच्या अभ्यासाचे लक्षण ज्ञाते लोक सांगतात. परंतु सर्वास मान्य असे योगाचे लक्षण म्हंटले म्हणजे डाव्या नाकपुडीने वायु आत ओढून घ्यावा, तो कुंभकाने थांबवून धरावा आणि मग तो उजव्या नाकपुडीने सोडावा किंवा उजव्या नाकपुडीने वायु आत घ्यावा, तोही कुंभकाने थांबवून धरावा आणि मग तो डाव्या नाकपुडीतून सोडावा. त्यामध्ये अदलाबदल करू नये आणि क्रमात बिघाड करू नये. कारण हे योगाभ्यासाच्या अगदी विरुद्ध आहे. कोणताही उतावळेपणा न करिता स्वस्थचित्ताने हळूहळू अभ्यास करावा ह्यात जर उतावळेपणा केला, तर हीही तड नाही आणि तीही तड नाही, अशी साधकांची अवस्था होते. एव्हढं सांगून झाल्यावर भगवंत पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे मुंगी पर्वत चढू लागली, तर ती चढत जाते, खाली पडत नाही आणि तोच जर जातिवंत घोडा चढू लागला, तर मोठय़ा कष्टानेही तो चढू शकत नाही. त्याप्रमाणे ह्या योगाभ्यासात ज्ञान व शहाणपण काही चालत नाही. शहाणपणाची घमेंड बाळगणाराचा अधःपातच होतो. त्याला त्या मार्गात पुढे जाणे कधीच साधत नाही. उद्धवा ! मुंगीसारखा जो हळूहळू योगमार्गाने जाण्याचा अभ्यास करतो, तोच खरोखर ओंकाराच्या मस्तकावर चढतो, हे लक्षात ठेव. अभ्यास पक्का झाला असता, समरांगणांत जसा मोठा शूर पुरुष अनावरपणे लढतो, त्याप्रमाणे साधकाच्या मनोरथाप्रमाणे प्राणवायु चालत असतो. अभ्यासाच्या धडाक्मयाने प्राण भयंकर खवळून गेला असता तो प्राण आणि अपान ह्यांचे भेदच मोडून टाकतो आणि चक्रातील पदर दूर करतो. यात माझे भजन दोन प्रकारचे असते. एक असते ते योगयुक्त असून निर्गुणाचे असते आणि दुसरे असते ते ओंकाराच्या अभ्यासाने सगुण भक्त करीत असतात. त्याबद्दल सांगतो ऐक. प्राणायामचे सगर्भ प्राणायाम आणि अगर्भ प्राणायाम असे दोन प्रकार आहेत. सगर्भ प्राणायाम शास्त्राsक्त मार्गाने शुद्ध आहे आणि सगुणध्यानादिकांचा जो संबंध तो दुसरा अगर्भ प्राणायाम होय. ॐकाराचा दीर्घ उच्चार वाणीला करता येत नसला, तरी तोच ओंकार हृदयामध्ये सतत एकसारखा चाललेलाच असतो. सूक्ष्म तंतु असावेत, त्याप्रमाणे मूळापासून तो ब्रह्मरंध्राच्या शेवटापर्यंत प्राणायामने युक्त असा प्रणव भासतो. तेथे अतिशय दीर्घ स्वराने नाद होत असतो. त्यामुळे अत्यंत सूक्ष्म रीतीने प्रणवाचा भास होतो. प्राणायामने तो स्थिर, अखंडस्वरूप व नादयुक्त असा होतो. अशा रीतीने दररोज तीन वेळा, प्रत्येक वेळी दहा वेळा, ॐकारासहित प्राणायामचा अभ्यास करावा असे केल्याने एक महिन्याच्या आतच प्राणवायू वश होतो. अशा प्रकारे स्वर, वर्ण आणि मात्रा यांच्याहूनही निराळा, अत्यंत श्रे÷ व अदृश्य असा जो प्रणव म्हणजे ओंकार, त्याला कित्येक अभ्यासाच्या सामर्थ्याने स्वतःच्या इंद्रियांना समजेल असा करून घेतात. त्या उच्चाराचा आश्चर्यकारक चमत्कार आहे. तो ऊर्ध्वमुख असून अखंड अस्तित्वात असतो. तोच झणत्कारयुक्त
तो घंटानादाप्रमाणे सारखाच चाललेला असतो. अशा प्रकारे आळस सोडून प्राणायामसह प्रणवाचा त्रिकाळ अभ्यास करताना प्रत्येक वेळी सावकाश सावकाश दहा दहा आवृत्ती केल्या तर ज्याप्रमाणे एखादी महासाध्वी पतिव्रता आपल्या पतीचे वचन मुळीच उल्लंघन करीत नाही, त्याप्रमाणे एक महिना पूर्ण होण्याच्या आंतच हा प्राणजय साध्य होतो.
क्रमशः







