प्रतिनिधी/ गोडोली
तब्बल 7 शासकीय कार्यालये असलेल्या प्रांताधिकारी कार्यालयाचा परिसर अस्वच्छ आहे. प्रत्येक कोपऱयात कचरा, रिकाम्या दारुच्या बाटल्या, पत्रावळ्या आणि मुतारीसाठी वापर केला जात असल्याने अस्वच्छेमुळे दुर्गंधी पसरली आहे. सातारा शहराला राष्ट्रीयस्तरावरील स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला असताना पोवई नाक्यावरील सर्वाधिक नागरिकांची वर्दळ असलेल्या शासकीय कार्यालयाचा हा अस्वच्छ परिसर अशोभनीय असून वरिष्ठांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
प्रत्येक कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, हे कार्यालय प्रमुखांचे कर्तव्य आहे. पोवई नाक्यावर असलेल्या प्रांताधिकारी कार्यालय परिसरात तब्बल 7 कार्यालये असल्याने स्वच्छतेकडे कोणताही अधिकारी कधीच लक्ष देत नाही. सध्या हा परिसर अस्वच्छ त्यात तुंबलेल्या मुतारीमुळे प्रत्येक कोपऱयात लघवीसाठी सर्रास वापर केला जात आहे.
त्यात परिसराची कधीच स्वच्छता केली जात नसल्याने कार्यालयाची झाडलोट करून कचरा कोपऱयात टाकायची कर्मचाऱयांना सवय लागली आहे.
त्यात कार्यालयात पाटर्य़ा झाल्यावर खरकटय़ा पत्रावळी आणि दारुच्या बाटल्या काही कोपऱयात पडलेल्या दिसतात. याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कोणीच बोलत नाही. अस्वच्छ परिसर आणि पसरलेल्या दुर्गंधीचा त्रास सर्वांना होतो. दिवसभर तोबा गर्दी असलेल्या या परिसरात लाखात आणि हजारोंचे आकडेवारीत पगार घेणाऱया अधिकारी आणि कर्मचाऱयांना अस्वच्छ आवाराबाबत काही वाटत नाही, याचे आश्चर्य येणाऱया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
चौकट –
परिसराची रया गेली
जप्त केलेल्या वाळूच्या ढिगांची माती झाली आहे. काही वाहने गंजलेल्या अवस्थेत उभी आहेत. त्यात बेशिस्त पार्किंग यामुळे आधीच अस्वच्छता आणि त्यात मातीचे ढिग, वाहने या परिसराची रया घालवली आहे. सध्या कार्यालयीन कामकाजात उठावदार काम करणारे सर्व अधिकारी या परिसरात कार्यरत असून त्यांनी ठरवले तर हा परिसर चकाचक करून दाखवतील, हा विश्वास अनेकांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.








