नव्या चेहऱयांना संधी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणूक रिंगणात चार माजी महापौरांसह उपमहापौर आणि 38 नगरसेवक होते. मात्र बहुतांश माजी नगरसेवक व माजी नगरसेविकांना पराभव पत्करावा लागला असून महापालिकेच्या सातव्या सभागृहात नव्या चेहऱयांना संधी मिळाली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या भूमिकेकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.
आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी जुन्या आणि नवीन अशा सर्वच चेहऱयांना संधी मिळत होती. मात्र या निवडणुकीत प्रस्थापित माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत चार माजी उपमहापौरांसह 10 माजी नगरसेवकांच्या पत्नी निवडणूक रिंगणात होत्या. असे एकूण 48 माजी नगरसेवक निवडणूक लढवित होते. मात्र या निकालात माजी महापौर-उपमहापौर यांच्यासह दोन-तीन अपवाद वगळता माजी नगरसेवकांच्या पारडय़ात पराजय आला आहे. या निवडणुकीत चार दाम्पत्य रिंगणात होती. मात्र त्यांनादेखील फटका बसला.
माजी नगरसेवक राकेश पलंगे, पंढरी परब, राजू बिर्जे, रायमन वाझ, अमर येळ्ळूरकर, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, फईम नाईकवाडी, दीपक वाघेला, धनराज गवळी, विनायक गुंजटकर, व्ही. लोकेश, दिनेश नाशीपुडी, संजय शिंदे, सतीश म्हार्दोळकर, नेताजी मनगुतकर, दीपक जमखंडी, माजी उपमहापौर मीना वाझ, संयोगीता हलगेकर, मधुश्री पुजारी, सरला हेरेकर, मीनाक्षी चिगरे, सुधा भातकांडे, जयशीला सायनाक, जयश्री माळगी, अनिता किटवाडकर, अरुणा कुटे, अल्मास मतवाले, पुष्पा पर्वतराव यांचा पराभुतामध्ये समावेश आहे.









