ऑनलाईन टीम / पणजी :
प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज गोव्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये प्रवेश केला. नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभु यांनी देखील यावेळी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीने ट्विटरवर याची माहिती दिली आहे.
ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याचा त्यांचा विचार आहे. त्यादृष्टीने त्या गोव्यातील पदाधिकाऱ्यांशी देखील बैठक घेणार आहेत. 2022 मध्ये सर्वच्या सर्व 40 जागांवर तृणमूल काँग्रेस उमेदवार देणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. दरम्यान, ममता बॅनर्जी गोव्यातील तीन प्रमुख मंदिरांना देखील भेटी देणार आहेत. तसेच मच्छीमारांना आणि नागरिकांना भेटणार आहेत.