ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या.
खान यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 17 जून रोजी त्यांना वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांची तब्येत खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
सरोज खान यांनी 1983 मध्ये हिरो चित्रपटातून नृत्य कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदी सिनेमाची अनेक सुपरहिट गाणी कोरिओग्राफ करण्याचे काम त्यांनी केले. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत सरोज खान यांच्याकडे दोन हजारांहून अधिक गाण्यांच्या नृत्यदिशाचे श्रेय आहे. कोरिओग्राफीच्या कलेमुळे सरोज खान यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.









