बेंगळूर, ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
भारताचा युवा जलद गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा व न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज टीम सेफर्ट यांना कोरोनाची बाधा झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी स्थगित केल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेत या दोन्ही क्रिकेटपटूंनी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
25 वर्षीय प्रसिद्ध कृष्णा बेंगळुरातील आपल्या घरीच क्वारन्टाईन झाला. कोरोनाची बाधा झालेला तो केकेआरचा चौथा खेळाडू ठरला. यापूर्वी केकेआरच्या वरुण चक्रवर्ती व संदीप वॉरियर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. अन्य सर्व भारतीय खेळाडूंप्रमाणेच प्रसिद्ध कृष्णाने देखील 3 मे रोजी बायो-बबल सोडले आणि त्यावेळी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. मात्र, बेंगळुरात पोहोचल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.
न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज व केकेआरमधील प्रसिद्ध कृष्णाचा सहकारी टीम सेफर्ट हा देखील कोरोना पॉझिटिव्ह झाला असून सध्या तो अहमदाबादमध्ये आयसोलेट झाला आहे. नंतर त्याला चेन्नईतील एका खासगी इस्पितळात दाखल केले जाणार आहे. मागील 10 दिवसात सेफर्टचे 10 चाचणी निगेटिव्ह होते. पण, न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी दोन्ही चाचणीत त्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले. यामुळे, भारतातच थांबणे त्याच्यासाठी भाग होते.