कोरोनामुळे संपूर्णतः बंद पडलेला करमणूक उद्योग आता हळूहळू सुरू होतो आहे. टाळेबंदीमुळे दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग करायलाच परवानगी नव्हती. कलावंतांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर काही
अटी शर्तींसह शूटिंगला परवानगी देण्यात आली. काहीजणांनी ऑनलाइन माध्यमाचा उपयोग करून मालिका सुरू ठेवल्या. काही कलावंतांनी अतिशय प्रभावी असा सामाजिक संदेश देण्याचे कामही समाजमाध्यमांच्या मदतीने केले तर काहींनी चाहत्यांसोबत ऑनलाइन संवाद साधत, या क्षेत्रातील आपले अस्तित्व राखून ठेवण्याचा प्रयत्न केला. विषाणूंवरचे काही चित्रपटही लोकांनी मोठय़ा संख्येत बघितले.
कोरोनामुळे 24 मार्चला प्रदर्शित होणारा रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट पुढे ढकलावा लागला. तर 1983 साली भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला, त्या विजयाची गोष्ट सांगणारा ‘83’ हा चित्रपट 10 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण त्याचेही प्रदर्शन पुढे ढकलावे लागले. प्रोडय़ुसर्स गील्ड ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हिंदी चित्रपटसृष्टीवर दहा लाख लोकाचे जीवन अवलंबून आहे. त्यातील 35 हजार रोजंदारीवरील कामगार आहेत. ते सर्व बेकार झाले आहेत. हजारो थिएटर्स बंद पडल्यामुळे, थिएटर कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. नाटय़गृहे बंद असल्यामुळे रंगभूमी कलावंत, निर्माते आणि कामगार संकटात आहेत. नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे जेव्हा सुरू होतील, तेव्हा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे ती पूर्ण क्षमतेने चालवता येणार नाहीत. परिणामी तिकिटांचे दर आणखी वाढवावे लागतील. आधीच मराठी नाटकांच्या तिकिटांचे दर 500 रु. 300 रु. असे असून ते सामान्यांच्या आवाक्मयाबाहेर गेले आहेत. मल्टिप्लेक्समधील तिकिटांचे दरही भरमसाट आहेत. त्यामुळे पहिल्या प्रथम बडय़ा कलावंतांनी आपले मानधन कमी केले पाहिजे, तरच निर्मितीवरचा खर्च कमी होऊ शकतो.
कोरोनाच्या आपत्तीमुळे अमिताभ बच्चनचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट एप्रिल महिन्यात दोन हजार थिएटर्समधून प्रदर्शित होणार होता, तो आता अमॅझॉन प्राइम व्हीडिओवर प्रदर्शित होत आहे. अर्थात यामुळे तो एकाच वेळी 200 देशांमध्ये दिसू शकेल. कोरोना नसता, तर त्याने अर्थातच अधिक गल्ला कमावला असता. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रथम प्रदर्शित होणारी ही सर्वात बडी फिल्म होय. त्याअगोदर 29 मे रोजी ‘पोनमगल वंधल’ हा तामीळ चित्रपट या पद्धतीने प्रदर्शित झाला होता. आता विद्या बालनचा प्रसिद्ध गणिती शकुंतलादेवी यांच्यावरील चरित्रपट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरच दिसणार आहे. अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी बाँब’ हा कॉमिक-हॉरर सिनेमा डिस्नेहॉटस्टारवर बघायला मिळणार आहे. वाढते व्याजदर, रद्द झालेली शूटिंग्ज, बंद पडलेले खर्चिक सेट्स यामुळे चित्रपट निर्मात्यांचे करोडोंचे नुकसान झाले आहे. म्हणूनच स्ट्रीमिंग सर्व्हिसेसमुळे त्यांना निदान एक पर्याय तरी निर्माण झाला आहे. खरेतर जीवदानच म्हणायला हवे. अन्यथा 50-100 कोटींची गुंतवणूक करून सिनेमा बनवायचा आणि तो प्रदर्शितच होऊ शकत नसल्या कारणाने गुंतवणुकीवर केवळ व्याज भरत राहायचे, अशी समस्या उद्भवली असती. बॉलिवूडमध्ये कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले, की त्याला विरोध करणारा एक गट कार्यरत असतोच. जेव्हा टीव्ही आला, मग व्हीडिओ आला, पुढे सॅटेलाइट चॅनेल्स सुरू झाले आणि त्यावर लोकांना घरबसल्या चित्रपट बघायला मिळू लागले, तेव्हादेखील थिएटरवाल्यांनी त्या बदलाला विरोध केला होता. याहीवेळी त्याचीच पुनरावृत्ती घडते आहे. मुंबईत आयनॉक्स लीझर या मल्टिप्लेक्स चेनने एक प्रसिद्धिपत्रकच काढले आणि ‘गुलाबो सिताबो’च्या डिजिटल प्रदर्शनाबद्दल नापसंतीच व्यक्त करून टाकली. आयनॉक्सकडे भारतातील 68 शहरात 626 स्क्रीन्स आहेत. 1.7 अब्ज डॉलर्स एवढी त्याची वार्षिक उलाढाल आहे. पीव्हीआर या कंपनीकडे भारतातल्या 71 शहरातून 845 स्क्रीन्स आहेत. त्यांनीदेखील एखाद्या चित्रपटाचा प्रिमियम डिजिटल प्लॅटफॉर्मवर होतो, ते आपल्याला रुचलेले नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. आता या मंडळींनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, थिएटर सुरू होईपर्यंत चित्रपटाचा प्रिमियमच करायचा नाही, असे निर्मात्यांना करताच येणार नाही. याचे कारण, नंतर चित्रपटांची रांगच्या रांग लागेल आणि त्यांना आपल्या चित्रपटांसाठी थिएटर मिळावे, यासाठी अजून वाट बघावी लागेल. या परिस्थितीचा फायदा प्राइम व्हीडिओ, नेटफ्लिक्स, डिस्नेहॉटस्टार, अमॅझॉन प्राइम हे ओटीटी प्लेअर्स घेत आहेत. टाळेबंदीच्या काळात त्यांच्या वर्गणीदारांमध्ये दोनतृतीयांशाने वाढ झालेली आहे. तरुण पिढी ओटीटी प्लॅटफॉर्मसवरी वेबसिरीज व चित्रपट पाहणे अधिक पसंत करते आहे. खरेतर केवळ ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी म्हणून जे चित्रपट बनवले जातील, ते आशय व अभिव्यक्तीबाबत अधिक स्वातंत्र्य घेऊ शकतील, असे वाटते. कोरोनाच्या काळात सलमान खानने अनेक चित्रपट कामगारांच्या खात्यात मदतीची रक्कम ट्रान्सफर केली. शाहरुख खानने पश्चिम बंगालमधील चक्रीवादळग्रस्त व कोरोनाग्रस्तांना अर्थसाह्य दिले. सोनू सूदने स्थलांतरित मजुरांची रेल्वे, बसगाडय़ा व विमानांतून वाहतुकीची व्यवस्था केली. अमिताभ बच्चन, स्वरा भास्कर, फरहान अख्तर हेही मदतीसाठी पुढे आले. बॉलिवूडमधील गायक व संगीतकारांनी डिजिटल कॉन्सर्टच्या माध्यमातून 50 कोटी रु. निधी संकलन करून ते पैसे कोरोनाग्रस्तांना दिले. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील कलावंतांचे फोटो काढणारे जे पापाराझी आहेत, त्यांना काही कामच उरले नाही. म्हणून निर्माता रोहित शेट्टी व नायक हृतिक रोशन यांनी स्वतःच्या खिशातून त्यांना मदत केली.
मात्र टाळेबंदीमुळे घरात बसावे लागल्या कारणाने कलावंत, निर्माते, मॉडेल्स व फॅशन डिझायनर्स हे नेहमीच्या प्रसिद्धीपासून वंचित राहिले आहेत. माध्यमात आणि प्रेक्षकांच्या मनात आपण सतत राहिले पाहिजे, नाहीतर आपल्याला कोणी विचारणार नाही, याची जाणीव या मंडळींना असते. त्यामुळे लाइमलाइट नसला, की ही मंडळी अस्वस्थ असतात. म्हणूनच आपले क्वारंटाइनमय जीवन या ना त्या प्रकारे लोकांसमोर आणण्याचा ते प्रयत्न करतात. कोणी वाचतानाचे, कोणी स्क्रीप्ट चाळतानाचे, कोणी व्यायाम करतानाचे, तर कोणी चविष्ट पदार्थ बनवतानाचे व्हीडिओ शूट करून ते समाजमाध्यमांवर टाकतात. झूम इंटरव्हय़ूज, इन्स्टाग्राम लाइव्हस्ट्रीम्स आणि स्वतः नाचता-गातानाचे स्वतंत्र व्हीडिओज हे सर्व पहायला मिळतात. लॉकडाउनमुळे ये करो-ना, वो करो-ना अशी बंधने सगळय़ांवरच होती व अजूनही ती तशी आहेतच. पण प्रसिद्धीचा व्हायरस चावलेला असल्यामुळे, झोतात राहण्याचे असे वेगळे प्रयत्न होत राहिले. यानंतरही कलाक्षेत्रातले डिजिटल जीवन अधिक ठळक होत जाणार, असे एकूण दिसत आहे…
नंदिनी आत्मसिद्ध








