काँग्रेस पक्षात प्रवेश
प्रतिनिधी /पणजी
सांगे मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनी काल रविवारी आमदारकीचा राजीनामा दिला आणि लगेचच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या सांगेतील काँग्रेस उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव व इतर नेत्यांनी गांवकर यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.
सांगेत आता काँग्रेस पक्ष बळकट झाला असून तेथे निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सांगे हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि तो आता पुन्हा काँग्रेसला मिळवून देणार असल्याची खात्री गांवकर यांनी प्रकट केली. रविवारी सकाळच्या सत्रात गांवकर यांनी पर्वरी येथील विधानसभा संकुलातील सभापती राजेश पाटणेकर यांच्या कार्यालयात जाऊन आमदारकीचा राजीनामा सादर केला. राजीनामा देऊन परतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पर्रीकर हे मुख्यमंत्री असेपर्यंत सर्व काही ठिक होते परंतु ते गेल्यानंतर सांगे मतदारसंघाकडे दुर्लक्ष करण्यात आले. भाजप सरकारच्या काळात जनता सुखी नाही. त्यांच्यात असंतोष खदखदत असून काँग्रेसच्या काळात जनता समाधानी होती परंतु आता ती नाही म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









