वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
यंदाची आयपीएल स्पर्धा प्रसंगी रिकाम्या स्टेडियममध्ये भरवू, पण, ही स्पर्धा तर या वर्षातच होईल, असा दुर्दम्य जिद्दीचा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी व्यक्त केला. सध्या आम्ही सर्व पर्याय विचाराधीन ठेवले आहेत, असे गांगुली म्हणाले. बीसीसीआयने बुधवारी उशिरा सर्व संलग्न संघटनांना पत्रक जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली.
‘आयपीएल स्पर्धा भरवण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत आणि त्यासाठी कोणत्या विंडोची निवड करावी, हे आम्ही आजमावून पाहत आहोत. वेळ पडली तर रिकाम्या स्टेडियममध्येही आयपीएल खेळवण्याची आमची तयारी आहे. चाहते, प्रँचायजी, खेळाडू, ब्रॉडकास्टर्स, प्रायोजक व अन्य सर्व संलग्न घटक या सर्वांनाच आयपीएलचे आतापासून वेध लागले आहेत. बीसीसीआय याबाबत लवकरच रुपरेषा स्पष्ट करेल’, असे गांगुली येथे म्हणाले.
या वर्षाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा आयसीसीने रद्द केल्यास त्याच स्पर्धेच्या कालावधीत अर्थात, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएल स्पर्धा घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. मात्र, आयसीसीने विश्वचषक स्पर्धेचा फैसला पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर टाकला आहे.
प्रथमश्रेणी स्तरावरील रणजी, दुलीप चषक व विजय हजारे स्पर्धा अधिक अटीतटीने खेळवले जाण्यासाठी काय बदल करावेत, याचाही मंडळ विचार करत आहे. येत्या काही आठवडय़ात याबाबत निर्णय होईल’, असे गांगुली याप्रसंगी म्हणाले.









