वार्ताहर/ एकंबे
चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जवान विजय पांडुरंग जाधव (वय 39) यांचे सोमवारी सकाळी पुणे येथे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या आवारात प्रशिक्षणादरम्यान धावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी चिमणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, भावजय व पुतण्या असा परिवार आहे. जाधव कुटुंबियांना सैन्य दलाच्या सेवेची विशेष परंपरा आहे. त्यांच्या निधनामुळे चिमणगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. विजय जाधव हे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्य दलामध्ये दि. 23 ऑगस्ट 2001 रोजी शिपाई म्हणून सातारा येथे भरती झाले. त्यानंतर पुण्यातील बॉंबे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये त्यांचे प्रशिक्षण झाले. तेथून पंजाबमध्ये पटियाला येथे पहिली नेमणूक देण्यात आली. पटियाला, अमृतसर, झाशी, श्रीनगर, हिस्सार, पुणे येथे नाईक व हवालदार पदावर काम केले. सध्या त्यांना झाशी येथे नेमणूक देण्यात आली होती.
पुणे येथे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या प्रशिक्षण वर्गासाठी ते दोन आठवडय़ांपूर्वी पुण्यात आले होते. त्यांचे प्रशिक्षण सुरु असताना सोमवारी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी धावत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने त्यांना पुण्यातील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. वीर जवान विजय जाधव यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी 8 वाजता चिमणगाव येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येणार असून, काळेश्वर हायस्कूलसमोरील मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विजय जाधव यांच्या कुटुंबाला सैन्य दलाची गौरवशाली परंपरा आहे. वडील पांडुरंग जाधव यांनी सैन्य दलामध्ये उत्कृष्ट सेवा बजावली असून, सध्या ते सेवानिवृत्त म्हणून गावीच असतात. बंधू नंदकुमार हे देखील सैन्य दलात पुणे येथे कार्यरत आहेत.








