वृत्तसंस्था/ मँचेस्टर
विंडीजचा क्रिकेट संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये यापूर्वीच दाखल झाला आहे. गेल्या शुक्रवारी एका व्यक्तीच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिल्यानंतर विंडीजचे प्रमुख प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांनी स्वतःहून विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला.
ओल्ड टॅफोर्ड येथील एका हॉटेलमध्ये सिमॉन्स यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. विलगीकरण कालावधी संपल्यानंतर सिमॉन्स यांची दोनवेळा कोरोना चांचणी घेतली जाईल. या चांचणीत ते कोरोनापासून अलिप्त झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना आपल्या संघात गुरूवारी दाखल होता येईल. इंग्लंड आणि विंडीज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार असून या मालिकेसाठी विंडीज संघाच्या सरावावर कोणताही विपरित परिणाम झाला नसल्याचा खुलासा या संघातील वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने शनिवारी ब्रिटीश प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. विंडीज संघाला साहाय्यक प्रशिक्षक रॉडी इस्टवीक आणि रेयॉन ग्रिफीथ यांचे मार्गदर्शन मिळत आहे. सोमवारपासून विंडीजच्या दुसऱया सराव सामन्याला प्रारंभ होणार आहे. विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी साऊदम्पटन येथे 8 जुलैपासून खेळविली जाईल. विंडीज संघात होल्डर, रॉच, गॅब्रियल आणि जोसेफ हे चार प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत.









