जयपूर / वृत्तसंस्था
आगामी आयपीएल 2022 हंगामाच्या पार्श्वभूमीवर, राजस्थान रॉयल्सने जलद गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा व टीम कॅटॅलिस्ट पॅडी उप्टन पथकात दाखल झाले असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. कुमार संगकारा हा या संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे.
38 वर्षीय टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार मलिंगा या हंगामात राजस्थानच्या जलद गोलंदाजांना मार्गदर्शन करेल. 2014 आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे लंकेला जेतेपद मिळवून देणाऱया मलिंगाचा अनुभव संघातील गोलंदाजांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा राजस्थान रॉयल्सने नोंदवली.
17 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मलिंगाने लंकेतर्फे तिन्ही क्रिकेट प्रकारातून 340 सामन्यात 546 बळी घेतले. आयपीएल स्पर्धेत त्याने फक्त मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करताना 122 सामन्यात 170 फलंदाजांना गारद केले. अगदी अलीकडे फेब्रुवारी 2022 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत लंकन संघासाठी बॉलिंग स्ट्रटेजी कोच म्हणून काम पाहिले.









