मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार
प्रतिनिधी/ काणकोण
प्रशासन आपल्या दारात हा निवडणुकीचा स्टंट नसून केंद्र सरकारची आत्मनिर्भर भारत आणि गोव्याची स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविलेला उपक्रम आहे. आपल्या मुख्यमंत्रिपदाला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत आणि कोविड महामारीने खऱया अर्थाने आमचे डोळे उघडले आहेत, असे सांगून, लाल फितीत अडकलेल्या फाईल्सना चालना देण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काणकोण येथे बोलताना स्पष्ट केले.
शेळेर येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भव्य अशा वास्तूत गोव्याचे संपूर्ण प्रशासन यावेळी काणकोण मतदारसंघातील लोकांना मदत करण्यासाठी उपस्थित होते. या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमासाठी गोव्याच्या विविध अशा 25 खात्यांचे प्रमुख हजर आणि त्या त्या खात्यासंबंधीची माहिती देण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र असे स्टॉल उघडण्यात आले होते. या कार्यक्रमाचे समई प्रज्वलित करून मुख्यमंत्री सावंत यांनी उद्घाटन केले. व्यासपीठावर काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, महसूल सचिव संजय कुमार, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिका कटियाल उपस्थित होत्या.
आपला देश यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. तर गोवा मुक्तीचा 60 वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. अशा परिस्थितीत साधनसुविधांबरोबरच माणसांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात. येणाऱया तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि लगेच त्याचा अहवाल घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सावंत यांनी काणकोण मतदारसंघाला भरभरून दिलेले आहे. या ठिकाणचा बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी उपसभापती फर्नांडिस यांनी केली. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता भट पुराणिक यांनी केले. पैंगीणच्या स्वर अलंकार या गटाने सादर केलेल्या स्वागत गीतानंतर मास्तीमळ वॉर्डाच्या नगरसेविका सुप्रिया देसाई यांनी स्वागत केले, तर माजी नगराध्यक्षा नीतू देसाई, श्रीस्थळच्या उपसरपंच विद्या गायक, गावडोंगरीच्या सरपंच सुमन गावकर, खोतीगावच्या उपसरपंच भाविका देसाई, आगोंदच्या पंच शिल्पा पागी, लोलयेच्या पंच जेसिका कॉर्त यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. खोल जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप यांनी आभार मानले.
साडेतीन हजार लोकांची उपस्थिती
प्रशासन आपल्या दारीमुळे शेळेर येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. जवळजवळ साडेतीन हजार इतक्या लोकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात सर्वत्र मुख्यमंत्री तसेच या कार्यक्रमाचे कटआऊट्स लावण्यात आले होते काणकोण भाजप मंडळ, महिला मोर्चा तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी भगव्या फेटय़ांत वावरताना दिसत होते. या कार्यक्रमाला जे लोक आले होते त्यांची नोंदणी करण्यासाठी उभारलेल्या कक्षावरील छप्पर भगव्या रंगाने शाकारले होते. त्यामुळे कार्यक्रम सरकारचा की भाजपचा हे कळायला मार्ग नव्हता. मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू असताना भाजपचे कार्यकर्ते मध्ये मध्ये घोषणा देत होते. भाजप कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या ढोल-ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
लोकांना माहिती समजावून सांगण्याची सूचना
उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी उभारलेल्या 25 विविध खात्यांच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि सरकारी योजनांची माहिती व्यवस्थित लोकांना समजावून सांगण्याची सूचना केली. या कार्यक्रमाला लाभलेली उपस्थिती पाहून आपण धन्य झालेलो आहे, असे सांगून उपसभापती फर्नांडिस यांचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला. ज्या ठिकाणी सरकारी अर्जांसाठी रक्कम आकारण्यात येत होती ती रक्कम लोकांकडून न स्वीकारता फर्नांडिस यांच्याकडून घेण्यात यावी, अशी सूचना याप्रसंगी करण्यात आली.
या कार्यक्रमात आरोग्य खात्याचा वेशेष स्टॉल उभारण्यात आला होता. त्यात गरोदर महिला, बालरोग यासंदर्भात तसेच दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, मधुमेह आणि अन्य रोगांसंदर्भात तपासणी करण्यात आली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर ही तपासणी करत होते. भाजापाचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी या ठिकाणी आकस्मिक भेट देऊन आढावा घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी काणकोणचे उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई, मामलेदार विमोद दलाल, भाजपाचे कार्यकर्ते लक्ष देऊन होते.









