सावंतवाडी / प्रतिनिधी –
कोरोना काळात जीवाची बाजी लावत, समाजसेवेत झोकुन काम करणाऱ्यांचा सन्मान प्रशासनाचावतीनं करण्यात आला. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याहस्ते समाजासाठी काम करणाऱ्या ‘देवदुतांना’ सन्मानीत करण्यात आलं. यामध्ये माजी शिक्षण व आरोग्य सभापती, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मंगेश तळवणेकर हे गेली ३० वर्ष निरपेक्ष भावनेनं समाजासाठी झोकून देत काम करत आहेत. सामाजिक, आरोग्य क्षेत्रात त्यांच मोठं योगदान आहे. तर युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून देव्या सुर्याजी रक्तदानाचं कार्य करत आहेत. कोरोनाकाळात ‘ब्लड बँक’ म्हणून त्यांचाकडे पाहिलं जातं. तसेच आरोग्याच्याबाबतीत सर्व समस्यांच्या वेळी रक्तदान आंदोलन, रुग्णमित्र म्हणून सदैव जनतेसाठी झोकून देऊन दिवसरात्र काम केलंय.गेल्या दिड वर्षात कोरोनाकाळात ५०० हून रक्तदात्यांनी रक्त, प्लाझमा दान करत अनेकांना जीवदान दिलं. युवा रक्तदाता संघटनेचा पुढाकारामुळे हे शक्य होऊ शकलं. यातीलच दुर्मिळ बी निगेटिव्ह रक्तगट असलेल्या दात्यांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये जयदीप बल्लाळ, वैभव मस्के, सिद्धेश नाईक, गोवा बांबोळीत जाऊन रक्तदान करणारे ओ निगेटिव्ह रक्तगटाचे रोशन राऊळ, वैभव दळवी, युवराज नाईक, वैभव कोरडे, आशिष साखळकर, हर्षल भांगले, संतोष सावंत, विजय सावंत आदी रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. तर जीवाची बाजी लावत काम करणाऱ्या तालुक्यातील सर्पमित्र राजन निब्रे, तुषार विचारे, नाविद हेरेकर, नबिला हेरेकर यांचाही सन्मान प्रांत, तहसीलदार यांचा हस्ते करण्यात आला.









