प्रतिनिधी/ बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी तसेच कर्मचारी म्हणून शिक्षकांची नेमणूक केली जाते. निवडणुकीपूर्वी या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. ज्या ठिकाणी प्रशिक्षण असते, त्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था केली जाते. परंतु यावेळी परिवहन कर्मचाऱयांचा संप सुरू असल्याने शिक्षकांना स्वतःच्या वाहनाने प्रशिक्षणस्थळी पोहोचावे लागणार आहे.
सोमवारी दुसऱया टप्प्यातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. बऱयाचवेळा प्रशिक्षणाचे ठिकाण दूरवर असल्याने शिक्षकांसाठी बसची व्यवस्था केली जाते. परंतु यावेळी मात्र संपामुळे बस उपलब्ध नसल्याने शिक्षकांची गैरसोय होणार आहे. शिक्षकांना स्वतःच्या वाहनाने प्रशिक्षणस्थळी पोहोचावे लागणार असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. बेळगाव तालुक्यातील शिक्षकांची बैलहोंगल, सौंदत्ती, गोकाक, रामदुर्ग या ठिकाणी प्रशिक्षण व निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.









