पिंपरी : सामाजिक कार्यकर्त्या सरिता प्रभाकर चव्हाण यांचे येथे निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती, तीन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ‘तरुण भारत’ पुण्याचे संपादकीय प्रमुख प्रशांत चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.
मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील डेरवणच्या असलेल्या चव्हाण यांनी पिंपरी -चिंचवड परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पोलीस नागरिक मित्र संघटनेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे. ‘आदर्श पोलीस नागरिक मित्र पुरस्कारा’नेही त्यांना गौरविण्यात आले होते.
चिखली येथील शब्दब्रम्ह संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक सांस्कृतिक, साहित्यविषयक उपक्रमात त्या अग्रभागी असत. महिला सक्षमीकरणाबरोबरच समाजातील वंचित घटकांना मदत करण्यात त्यांनी कायमच मोलाची भूमिका बजावली. लेखक व योगशिक्षक प्रभाकर चव्हाण यांच्या त्या पत्नी होत.








