नवी दिल्ली/प्रतिनिधी
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर मोदींविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ बांधत आहेत. त्याचबरोदर ते देशातील बड्या नेत्यांच्या गाठी भेटी घेताना दिसत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेतली आहे. परंतु प्रशांत किशोर आणि राहुल गांधींच्या भेटीनंतर किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याविषयी वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या अनेक बैठकांनंतर त्यांना पक्षात घेण्याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी घेतील. परंतु किशोर यांना काँग्रेसमध्ये घेण्याच्या निर्णयावर पक्षातील अनेक जणांचा याला विरोध असल्याचं वृत्त समोर येत आहे.एका वृत्त वाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
नितीशकुमारांच्या जनता दल युनायटेड सोबत काम करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी जुलै महिन्यामध्ये तिन्ही गांधींशी अनेक बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये त्यांच्या पक्षातील भूमिकेबद्दल तपशीलवार चर्चा झाल्याची माहिती मिळते. दरम्यान, याबाबत आता सोनिया गांधीचा अंतिम निर्णय काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. परंतु काही दिवसापूर्वी प्रशांत किशोर यांनी ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे किशोर यांना काँग्रेसमध्ये घेण्यावरून अनेकजण विरोध करत आहेत.
गेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत काम केलं आहे. सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांना काँग्रेस पक्षात येण्यास कोणतीही हरकत नसल्याचं म्हटलं आहे. सोनिया गांधींनी प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यासाठी अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली, पण या बैठकीत काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पक्षात घेण्यावर आक्षेप घेतला आहे. तर काहींनी काँग्रेसला त्यांचा फायदा होईल असं म्हणत त्यांच्या पक्षप्रवेशाला समर्थन दिलं आहे. परंतु किशोर यांना पक्षात प्रवेश आज्ञाच अंतिम निर्णय हा सोनिया गांधी घेणार आहेत.