ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत. पवारांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राष्ट्र मंचाच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर किशोर हे पवारांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे नव्या जोमाने सक्रिय झाले असून राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतली होती. ही भेट नेमकी कशासाठी होती, हे अखेरपर्यंत कळू शकले नाही. प्रशांत किशोर हे आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरविणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, किशोर यांनी ती चर्चा खोडून काढली होती.
त्यातच मंगळवारी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी देशातील 15 नेत्यांची बैठक झाली. यात देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. प्रशांत किशोर यांची पवारांसोबतची ही तिसरी बैठक असल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काँग्रेसला डावलून भाजपविरोधात महाआघाडी तयार करण्याचा कोणताही प्रयत्न सुरू नाही, असे ‘राष्ट्र मंच’ने मंगळवारीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अडीच तास झालेल्या बहुचर्चित बैठकीनंतर महाआघाडीची शक्यता तूर्तास तरी संपुष्टात आली आहे.