शिक्षण खात्याकडून सर्व शाळांना परिपत्रक जारी
प्रतिनिधी /पणजी
मुलांसाठी शाळा ऑनलाईन असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क घेण्यास शिक्षण खात्याने मनाई केली असून शाळांनी ते घेऊ नये, पालकांनी देऊ नये असे बजावण्यात आले आहे.
शिक्षण खाते संचालक डी. आर. भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांसाठी शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु झाल्या असून त्यांना शाळेत न बोलावता इतर पर्यायातून शिकवणी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने शाळेत नियमितपणे हजर राहून आपापली कामे करावीत. शिक्षकांनी मुलांशी संपर्क ठेवून त्यांना मार्गदर्शन करावे, असे सूचित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना अन्य पर्याय वापरण्यासाठी शाळांनी सहकार्य करावे. कोरोनामुळे मुलांसाठी प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात आली नाही. मागील वर्षभर शाळा चालू करण्यात आल्या नव्हत्या. तरीही अनेक शाळांनी विविध प्रकारचे शुल्क वसूल केले होते. तसे पुन्हा होऊ नये म्हणून सर्व शाळांनी दक्षता घ्यावी. शाळेचे वर्ग बंद असल्याने व शिकवणी ऑनलाईन केल्यामुळे प्रवेश शुल्क घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तशा सूचना शाळांना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मागील वर्षी शुल्क घेतल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यंदा अजूनपर्यंत तरी तक्रारी आलेल्या नाहीत. कोणतेही शुल्क शाळांनी घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश देणारे परिपत्रक शिक्षण खात्याने सर्व शाळांना जारी केले आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या सुमारे 2.80 लाख विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविना पुढच्या वर्गात पास करून नेण्यात आले आहे. ज्यांना ऑनलाईन शिकवणीत अडचणी येतात, त्यांना इतर पर्याय देऊन शिकवावे, अशा सूचना शिक्षकांना परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत.








