एनआयएकडून लूकआऊट नोटीस जारी : दोघा जणांवर 5 तर आणखी दोघांवर 2 लाखांचे बक्षीस
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळूर येथील प्रवीण नेट्टारु (वय 36) या भाजप कार्यकर्त्याच्या मारेकऱयांच्या शोधासाठी एनआयएने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. चौघा जणांची माहिती देणाऱयांना बक्षीसही जाहीर करण्यात आले असून पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या अटकेसाठी नागरिकांची मदत मागण्यात आली आहे.
एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी)ने राज्यातील सर्व पोलीस प्रमुख व पोलीस आयुक्तांना लूकआऊट नोटीस पाठविली आहे. यामध्ये चौघा जणांची छबी असून दोघा जणांसाठी प्रत्येकी 5 लाख व आणखी दोघा जणांसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
मोहम्मद मुस्तफा (रा. बेळ्ळारे, ता. सुळय़), तौफील एम. एच. (रा. मडिकेरी, जि. कोडगू) या दोघा जणांची माहिती देणाऱयांना प्रत्येकी 5 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. उमर फारुक एम. आर. ऊर्फ उमर (रा. मंगळूर), अबुबकर सिद्धिक ऊर्फ पेंटर सिद्धिक ऊर्फ गुजरी सिद्धिक (रा. बेळ्ळारे) या दोघा जणांवर प्रत्येकी 2 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
26 जुलै 2022 रोजी प्रवीण नेट्टारु (वय 36) या भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्याचा बेळ्ळारे येथे भीषण खून करण्यात आला होता. याप्रकरणी अनेकांची धरपकड करण्यात आली आहे. राज्य सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपविले आहे. पीएफआयच्या चार प्रमुखांना अद्याप अटक व्हायची आहे. त्यांच्याविषयी माहिती देणाऱयांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
080-29510900, 8904241100 या क्रमांकांवर माहिती देण्याचे आवाहन एनआयएने केले असून माहिती देणाऱयांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत. प्रवीण नेट्टारु यांच्या फरारी मारेकऱयांच्या शोधासाठी सर्वत्र शोध घेण्यात येत आहे.









