सणासुदीच्या वातावरणाचा लाभ : दुचाकीची निर्यात 25 टक्क्यांवर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागील महिन्यात प्रवासी वाहन आणि दुचाकी वाहनांसह अन्य वाहनांच्या विक्रीत सुधारणा होत असल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांकडून वाढलेली मागणी यासाठी कारणीभूत धरली जात आहे. याच जोरावर डीलर्सने आपला स्टॉक वाढविण्यावर भर दिलेला होता.
ऑक्टोबर महिन्यात प्रवासी वाहन विक्री मागील समान कालावधीच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढून 310,294 युनिटवर राहिली असल्याचे इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स (सियाम) यांनी स्पष्ट केले आहे.
टाटा मोटर्सच्या विक्रीचाही यामध्ये समावेश असून जवळपास 330,000 युनिटची विक्री होणार असल्याचे संकेत आहेत. कंपनीने महिन्याच्या आधारे विक्रीची आकडेवारी सादर करणे बंद केले आहे. सोबत बीएमडब्लू मर्सिडीज, वोल्वो ऑटो यांचाही यामध्ये समावेश आहे. मागील वर्षातील ऑक्टोबरमध्ये 271737 इतकी प्रवासी वाहन विक्री झाली होती. दुचाकीची विक्री दमदार
ऑक्टोबर महिन्यात दुचाकी वाहनांची विक्री 16.88 टक्क्यांनी वधारुन 2053814 युनिटवर राहिली. मागील वर्षात हा आकडा 1757180 युनिट होता. याच दरम्यान मोटारसायकलची विक्री 23.8 टक्के आणि स्कूटरची विक्री 1.79 टक्क्यांनी वाढली आहे. परंतु ऑक्टोबरला तीनचाकी वाहन विक्रीत 60.91 टक्क्यांची घसरण होत 26,187 युनिटवर राहिली होती. याच दरम्यान वाहनांची निर्यात 25.64 टक्क्यांनी वाढून 371013 युनिटस्वर पोहचली आहे.









