दोन आठवड्यात पॅसेंजर सुरू न झाल्यास रेल्वे अडविणार
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या तातडीने सुरू कराव्यात, या मागणीसाठी बुधवारी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मिरज जंक्शनवर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्टेशन प्रबंधक यांच्या केबिन समोर ठिय्या मारून पीआरपीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. कोरोना निर्बंधातून पूर्णतः शिथिलता मिळाली असल्याने बहुतांशी परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाई धोरणामुळे अद्यापपर्यंत सर्वसामान्यांची पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू झाली नाही.
त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात मिरज, कोल्हापूर, सातारा, कराड, पुणे, सोलापूर, हुबळी, आणि बेळगाव मार्गावर पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू न झाल्यास पीआरपीच्यावतीने रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.