बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाचा प्रसार वाढत असून लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन मंडळाने अतिरिक्त बसफेऱयांबरोबर स्थानिक व लांब पल्ल्याच्या काही बस फेऱया रद्द केल्या आहेत. त्यामुळे परिवहन मंडळाला मोठा फटका बसत आहे.
एरव्ही बस वाहतुकीवर प्रवाशांच्या गर्दीचा ताण मोठय़ा प्रमाणात असतो. मात्र कोरोनाच्या धास्तीने प्रशासनाने गरज असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शाळांनाही उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम राज्य परिवहन मंडळावर झाला आहे. प्रवासी संख्या कमी झाल्याने जिल्हय़ातील विविध आगारातून धावणाऱया काही बस फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच बेळगाव-कोल्हापूर मार्गावर दर अर्ध्या तासाला बसची फेरी होती. ती आता दर एक तासाला करण्यात आली आहे. मात्र शाळा-कार्यालयांना सुटी देण्यात आल्यामुळे काहीवेळा गावी जाणारे प्रवासी बसस्थानकात दिसून येत आहेत.
बसवाहक, चालक यांचा प्रवाशांशी थेट संपर्क येत असल्याने त्यांना सुरक्षेच्या योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून मास्क पुरविण्यात येत आहेत. तसेच आगारातून बाहेर पडत असलेल्या प्रत्येक बसेस निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. बेळगाव आगारातील बसेस कीटकनाशकांची फवारणी करून स्वच्छ करण्यात येत आहेत. स्वच्छतेबाबतची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र परीक्षेचा कलावधी लक्षात घेऊन जिल्हय़ातील ग्रामीण भागातील बससेवा सुरू राहणार आहेत.









