आणखी वाहनेही ढिगाऱयाखाली – 40 हून अधिक बेपत्ता, 10 मृतदेह हाती – बचावकार्य गतिमान
शिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्हय़ात महामार्गावर भूस्खलनाची मोठी दुर्घटना बुधवारी दुपारी घडली. हिमाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या धावत्या बसवर दरड कोसळल्याने मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दगड-मातीच्या ढिगाऱयाखाली प्रवासी बससह अन्य छोटी-मोठी वाहनेही अडकल्याने 50 ते 60 जण बेपत्ता झाल्याचा अंदाज आहे. या दुर्घटनेनंतर मदत व बचावकार्याला वेग आला असून सायंकाळपर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तसेच ढिगाऱयाखालून काढलेल्या 16 जणांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले.

हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलनामुळे ‘एचआरटीसी’ बससह अनेक वाहने ढिगाऱयाखाली दबली आहेत. किन्नौरमधील चौरा या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून ही दुर्घटना घडली. ‘एचआरटीसी’ बसवर दरड कोसळल्यानंतर बस चालक-कंडक्टरसह सर्व प्रवासी अडकले. घटनास्थळी एनडीआरएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, पोलीस, अग्निशमन यंत्रणेसह स्थानिक नागरिकांकडून मदत व बचावकार्य राबविण्यात येत आहे. याचदरम्यान दरडी आणि लहान-मोठे दगड कोसळण्याचे प्रकार सुरू असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. तरीही बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.
…अशी घडली दुर्घटना !
राज्य परिवहन मंडळाची बस किन्नौरहून शिमला या ठिकाणी जात होती. याचदरम्यान सुरुवातीला काही दगड बसवर कोसळले. त्यानंतर मोठी दरड कोसळल्याने बसच ढिगाऱयाखाली अडकली. प्राप्त माहितीनुसार बसमागे असलेली कार आणि अन्य काही गाडय़ाही या ढिगाऱयाखाली अडकल्या आहेत. घटनास्थळी थरकाप उडवणारी स्थिती निर्माण झाल्याचे छायाचित्र आणि व्हिडीओंवरून दिसून येत आहे.
सर्व यंत्रणा धावल्या मदतीला
किन्नौर येथे झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी प्रशासकीय अधिकाऱयांना बचावकार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक माहितीअंती एक बस आणि एक कार ढिगाऱयाखाली दबली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवासी बसमधील जवळपास 40 प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती देत 16 जणांना वाचवण्यात यश आल्याचेही ते म्हणाले. मी पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफला देखील अलर्ट दिला असून बहुतांश पथके मदतकार्यात लागल्याची माहितीही त्यांनी दिली.
पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी घेतला आढावा
या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत अपघाताची माहिती घेतली. तसेच घटनास्थळी लवकरात लवकर सुविधा पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्र्यांनी आयटीबीपीच्या महासंचालकांशीही चर्चा करून तातडीने मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून पोलीस, स्थानिक प्रशासन हे तातडीने मदतीसाठी पोहचले आहेत असे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना सांगितले आहे.









