सागरी जीव संशोधक स्वप्नील तांडेल यांची माहिती : सागरी पर्यावरण संतुलनासाठी पिल्लांचे मरतूक नियंत्रण हवे!
संदीप बोडवे / देवबाग:
ब्लॅक टीप शार्क अर्थात काळय़ा पाकाची मोरी ही सागरी परिसंस्थेत महत्वाची जैव प्रजाती आहे. समुद्रातील मत्स्य साठय़ांचा समतोल राखण्याबरोबरच प्रवाळ क्षेत्रांच्या संवर्धातही या माशाचा मोठा वाटा असल्याची माहिती सागरी जीव संशोधक स्वप्नील तांडेल यांनी दिली. ब्लॅक टीप शार्क ही सागरी प्रजाती संकटग्रस्त नसली, तरीही प्रवाळ क्षेत्र आणि सागरी पर्यावरण संतुलनासाठी या प्रजातीमधील पिल्लांची मरतुक नियंत्रित होणे आवश्यक असल्याचे मत तांडेल यांनी व्यक्त केले.
समुद्रातील प्रवाळ क्षेत्रात प्लवंग, शैवाल व अन्य एकपेशीय वनस्पतींवर गुजराण करणाऱया शाकाहारी माशांचा मोठा अधिवास पाहायला मिळतो. प्रवाळ क्षेत्रातून शार्क मासे नष्ट झाल्यास या भागात इतर शिकारी मासे आपला अधिवास निर्माण करतात. हे शिकारी मासे प्रवाळ क्षेत्रातील शाकाहारी माशांना आपले भक्ष्य बनवितात. त्यामुळे प्रवाळ क्षेत्रातून शाकाहारी माशांचे प्रमाण कमी होत जाते. मायक्रोअल्गे अर्थात एकपेशीय वनस्पती तसेच प्लवंग, शैवाल यासारख्या पाणवनस्पतींवर आपली गुजराण करणारे शाकाहारी मासे कमी झाल्यामुळे प्रवाळ क्षेत्रांमध्ये मायक्रोअल्गेसारख्या एकपेशीय वनस्पतींची मोठय़ा प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात होते. परिणामी प्रवाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. प्रवाळ क्षेत्रात शार्कच्या अधिवासामुळे या ठिकाणच्या शिकारी माशांच्या प्रमाणावर नियंत्रण राहण्यास मदत होते.
पिल्लांची मरतुक नियंत्रित व्हावी
ब्लॅक टीप शार्क म्हणजेच काळय़ा पाकाची मोरी, समुद्रावर उपजीविका असणाऱयांसाठी वरदानच आहे. त्याबरोबरच या प्रजातीचा अधिवास आपल्या समुद्रात वाढविणेही गरजेचे आहे. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील प्रवाळ क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर पर्यटन व्यवसाय केला जातो. शार्कची ही प्रजाती प्रवाळ क्षेत्रासाठी महत्वाची आहे. प्रवाळ क्षेत्रांमध्ये प्रजनन आणि पिल्लांचे पालन, पोषण करण्यासाठी शार्क आपला अधिवास निर्माण करतात. यामुळे प्रवाळ क्षेत्रांचेही आपसूकच संरक्षण होत असते. प्रवाळ क्षेत्रात शार्क (मोरी) चा पुरेसा अधिवास जपण्यासाठी या प्रजातींच्या पिल्लांची मरतुक नियंत्रित होणे आवश्यक आहे.
प्रजातीबाबत जनजागृती आवश्यक
काळे ठिपके असलेल्या पंखाची मोरीमध्ये पिल्ले तयार करण्याची क्षमता व पिल्ले देण्याची संख्या कमी असते म्हणजे त्यांची जननसंख्या सागरी परिसंस्थेत मर्यादित असते. त्यांची अन्य सागरी प्रजातींच्या तुलनेत फक्त एक ते दहा पिल्लं देण्याची क्षमता असते, तर गर्भावस्थेचा कालावधी 10 ते 12 महिने असतो. ही प्रजाती 2 वर्षांनी एकदा पिल्लांना जन्म देते. काळय़ा ठिपक्मयांची मोरी पिल्लांना जन्म देण्यासाठी आणि पिल्लांची वाढ करण्यासाठी किनाऱयालगतच्या प्रवाळ बेटात येतात. तेव्हा अनावधानाने जाळय़ात अडकून मृत्यू पावतात. जन्मावेळी पिल्लांचा आकार 38-72 सेमी असतो. परिपक्व होण्याचा नराचा कालावधी 4 ते 5 वर्षे, तर मादीचा 7 ते 8 वर्षे आहे. आयुष्यमान किमान 12 वर्षे आहे.
जीवंत पिल्ले आढळल्यास पाण्यात सोडा!
काळय़ा ठिपक्मयांची मोरी 9 फूटपर्यंत वाढते. मच्छीमारांनी साडेतीन ते चार फुटांवरील काळय़ा ठिपक्मयांची मोरी पकडावी आणि पिल्ले जीवंत जाळय़ात आढळल्यास त्यांना परत पाण्यात सोडून द्यावे, असे आवाहनही सागरी जीव संशोधक स्वप्नील तांडेल यांनी केले आहे.
मागील तीस वर्षांत अधिवास कमी झाला!
येथील ज्ये÷ मत्स्य जाणकार जॉन नऱहोना यांच्या मते, मागील काही वर्षांत काळय़ा ठिपक्मयाच्या पंखांच्या मोरीची संख्या झपाटय़ाने कमी होत गेली आहे. पूर्वीच्या काळी मालवणसह सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर या प्रजातीचे मासे मुबलक प्रमाणात जाळय़ात सापडायचे. आता ते प्रमाण फारच कमी झाले आहे. शार्कच्या या प्रजातीला स्थानिक बोलीभाषेत ‘वाटू’ असे संबोधले जात असे. या प्रकारची मोरी मासा आता फारच लवकर सापडत आहे. पूर्वी आपल्या तरुणपणी हे मासे डिसेंबर, जानेवारीच्या दरम्यान मच्छीमारांना जाळय़ात सापडत असत. त्या आधी किंवा त्यानंतर मात्र समुद्रात मात्र हा मासा येथील मच्छीमारांना मिळत नसे. आता ही परिस्थिती बदलली असल्याबाबत नऱहोना यांनी लक्ष वेधले.









