प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणारी विकासकामे प्रलंबित आहेत. मुख्य मंत्र्यांनी उद्घाटन केलेली विविध कामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. तसेच 2011-12 मध्ये सुरु केलेली कामे अद्यापही अपूर्ण असल्याने नगरविकासमंत्री बसवराज बी. ए. यांनी मनपा अधिक्षक अभियंत्यांना धारेवर धरले. इतकी वर्षे कामे पूर्ण होत नाहीत. तुम्ही काय करता? असा मुद्दा उपस्थित करून सर्व विकासकामे पंधरादिवसांत पूर्ण करून अहवाल देण्याची सूचना नगरविकासमंत्र्यांनी केली.
महापालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या विकास कामाची माहिती शुक्रवारी बैठकीत घेतली. शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. निधी उपलब्ध असून विकासकामेवेळेवर केली जात नाहीत. त्यामुळे मनपाच्या कामकाजाबद्दल नगरविकासमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. तर महापालिकेच्यावतीने तसेच मुख्यमंत्री शहर विकास अनुदानातून विविध विकास कामे हाती घेण्यात आली होती. पण बहुतांश कामे अद्यापही अपूर्ण आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते शहरात विविध विकासकामांसह शुभारंभ करण्यात आला होता. पण यापैकी पाच कामे अद्यापही अपूर्ण आहेत. व्हॅक्सिन डेपो परिसरात ग्लासहाऊसची उभारणी करून विकास करण्यासाठी निधीची तरतुद करण्यात आली होती. पण याठिकाणी केवळ ग्लासहाऊस उभारण्यात आले असून अन्य कामांकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. अशी विविध विकासकामे प्रलंबित असल्याबद्दल नगरविकासमंत्र्यांनी खंत व्यक्त केली.
ड्रेनेज वाहिन्यांचे काम देखील अर्धवट आहे. काही रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांनी भरलेल्या कररुपी निधीमधून विकासकामे राबविण्यात येतात. पण या कामांचा दर्जा खराब असल्यास तसेच वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या तक्रारी वाढणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. याची दक्षता घेणे महापालिकेच्या अधिकाऱयांचे कर्तव्य आहे. जर कंत्राटदार कामे वेळेवर करीत नसतील तर त्यांच्या कारवाई करा, असा आदेश नगरविकासमंत्री बसवराज बी. ए. यांनी बजावला.
शहरातील स्वच्छतेची काम देखील व्यवस्थित व वेळेवर होत नसल्याने खंत व्यक्त केली. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत 47 कोटीचा निधी खर्च करून कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. पण याचा उपयोग होत नसल्याचे माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येक घरासमोर आरएफआयडी बसविण्यात आले आहे. पण ही योजना कार्यान्वित करण्यात आली नाही. त्यामुळे कोट्टय़ावधीचा निधी वायपळ गेल्याची तक्रार नगरविकासमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या कामाची विचारणा करून ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनेच्या अधिकाऱयांना धारेवर धरले. तसेच शहराची स्वच्छता व्यवस्थित व वेळेवर करण्याची सूचना करून वैद्यकिय कचऱयाच्या विल्हेवारीबाबत माहिती घेतली. वैद्यकिय कचऱयाचे व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्याने कारवाई करण्याचा आदेश नगरविकासमंत्र्यांनी बजावला. जाहिरात कंत्राटदाराकडे 1 कोटीची थक्कबाकी असल्याने वसूल करण्यासाठी कायदेशी कारवाई करावी व शहरातील अनधिकृत फलक हटविण्याचा आदेश बजावला.
पाणी पुरवठा कामाचा आढावा घेवून 24 तास पाणी पुरवठा योजनेची माहिती जाणून घेतली. सदर कामे वेळेवर सुरु करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करावा, तसेच जलवाहिन्या घालताना सर्व सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. याची खबरदारी घ्या, अशी सूचना नगरविकासमंत्र्यांनी पाणी पुरवठा मंडळाच्या व पायभूत सुविधा मंडळाच्या अधिकाऱयांना केली. हलगा येथे सुरु असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करा तसेच 48 लाख रुपये पाणीपट्टी थकीत असल्याने वसूल करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची सूचना केली.









